औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे
औंध ग्रामीण रुग्णालयात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या संकल्पनेतून केंद्र शासनाने महिलांच्या आरोग्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाच्या सुदृढतेवर भर दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर औंध येथील ग्रामीण रुग्णालयात आज दि. 23 सप्टेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांचे ज्येष्ठ बंधू व जिल्हा परिषद गट औंधचे नेते अंकुश गोरे होते.
या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तज्ञ उपस्थित होते. यामध्ये मेडिसिनचे डॉ. खोब्रागडे, बालरोग तज्ञ डॉ. सावळकर व डॉ. दोशी, सर्जन डॉ. सोनार, त्वचारोग तज्ञ डॉ. जाधव, ऑंको-लॅबच्या डॉ. देसाई, दंतरोग तज्ञा डॉ. डाले, नेत्ररोग तज्ञा डॉ. धायगुडे, डॉ. मोहिते, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलासराव साळुंखे तसेच ग्रामीण रुग्णालय औंधचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शिंदे आदी मान्यवरांचा समावेश होता.
अध्यक्षीय भाषणात अंकुश गोरे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात महिलांवर कामाचा ताण प्रचंड आहे. त्यामुळे केंद्र सरकारने “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान हाती घेतले असून, स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेतल्यास संपूर्ण कुटुंब निरोगी राहते.
ते पुढे म्हणाले, “कॅन्सर, टी.बी., गर्भधारणा काळातील काळजी किंवा मुलींच्या मासिक पाळीविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. शासनाने शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून या सेवेचा लाभ घ्यावा.”
औंध ग्रामीण रुग्णालय आरोग्य समितीचे सभापती सुचक व माजी सरपंच दीपक नलावडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पूर्वी दवाखान्यात जाणे म्हणजे खर्चाचा विचार करूनच पाऊल उचलावे लागे. परंतु आता शासनाने शासकीय रुग्णालयांत विविध तपासण्या व मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी या सेवांचा लाभ घ्यावा.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलासराव साळुंखे यांनी केले. अभियानाचे महत्त्व डॉ. सचिन शिंदे यांनी उपस्थितांना पटवून दिले,डॉ. कश्मीरा निकम यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने परिसरातील महिला व शालेय विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती.