अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचा उपक्रम : गोशाळेला आर्थिक मदतीचा हात
आचार्य श्री वर्धमान सागर महाराजांच्या जन्मतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपली
म्हसवड –( प्रतिनिधी)सामाजिक जबाबदारीची परंपरा जपत, म्हसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था पुन्हा एकदा पुढे सरसावली आहे. आचार्य श्री वर्धमान सागर महाराज यांच्या जन्मतिथीनिमित्त, संस्थेच्या वतीने ‘वात्सल्य वारिधी’ गोशाळेला धान्य खरेदीसाठी धनादेश प्रदान करून समाजोपयोगी कार्याची नवी नोंद केली.
या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांच्या हस्ते धनादेश गोशाळा समितीचे अध्यक्ष शैलेश गांधी व प्रतीक दोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सामाजिक कार्याची अखंड परंपरा
अहिंसा पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून, विविध सामाजिक उपक्रमांत नेहमीच अग्रेसर राहिली आहे. दुष्काळग्रस्त मान तालुक्यातील चारा छावणीसाठी दिलेली भरीव मदत, तसेच ‘पाणी फाउंडेशन’ तर्फे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांना दिलेले आर्थिक योगदान ही त्यांची सामाजिक बांधिलकी दर्शवणारी ठळक उदाहरणे आहेत.
याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून प्रोत्साहन देणे, स्थानिक उपक्रमांना हातभार लावणे, अशी समाजाभिमुख कामगिरी संस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने राबविली जाते.
गोशाळेचा गौरव
आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेली ‘वात्सल्य वारिधी गोशाळा’ उत्तम पद्धतीने कार्यरत असून, तिच्या देखभालीसाठी स्थानिक समाज व दानशूर मंडळींचा सातत्याने पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अहिंसा पतसंस्थेने दिलेली आर्थिक मदत गोशाळेसाठी मोठा आधार ठरणार आहे.
या उपक्रमाबद्दल समाजातील विविध स्तरांतून संस्थेचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, अहिंसा पतसंस्था पुन्हा एकदा सामाजिक कार्यात आघाडीवर असल्याचे अधोरेखित झाले आहे.
