वार्ताहर – म्हसवड
माण तालुका गेल्या चार महिन्यांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोंकण सदृश झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी, नागरिक आणि व्यापारी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, घरांची पडझड, वाहतूक विस्कळीत होणे, रस्त्यांचे खड्ड्यात रूपांतर, तसेच नदी-नाल्यांना आलेला पूर या सर्वांचा फटका जनजीवनाला बसला आहे.
गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढल्याने म्हसवड शहर व परिसरात अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या. बाळासाहेब पिसे मोरे, माळवाडा (म्हसवड) यांचे घर कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्याच परिसरातील संतोष पिसे यांचे घराची भिंत कोसळली, तसेच शेजारील चार घरांनाही तडे जाऊन भिंती पडल्या. अचानक झालेल्या या पडझडीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
शेतात पाणी साचल्याने मका, बाजरी, कांदा व इतर पिके जळून गेली आहेत. तालुक्याच्या डोंगराळ भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे स्वप्न पाण्यात वाहून गेले आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने शेतात पाणी घुसले. अनेक ठिकाणी बांध फुटून शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
तालुक्यातील आंतरगाव व मुख्य रस्ते वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावे संपर्कविहीन झाली आहेत. शाळा, दवाखाने आणि शेतात जाणारे रस्ते चिखलमय झाल्याने ग्रामस्थांचे हाल झाले आहेत.
माण नदीला मोठा पूर आला असून, पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गावोगावच्या शेतकऱ्यांचा समान आक्रोश आहे की शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी. “चार महिने सलग पाऊस सुरू असल्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. सरकारने त्वरीत मदत द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
माण तालुक्याचे दृश्य सध्या कोंकणासारखे झाले आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, तातडीची मदत ही काळाची गरज आहे.
. घरात पाणी शिरलंय,
संसार उघड्यावर आलाय.
शेतशिवार पाण्याखाली गेलय,
श्वास कोंडून पिकांनी जीव सोडलाय.
स्वप्नांची तर राखरांगोळी झालीय,
आणि मायबाप सरकार म्हणतंय,
‘आम्ही जीएसटी कमी केलीय.
आता भरपूर खरेदी करा .
बचत उत्सव साजरा करा
आणि तोंड गोड करा ‘..
अरे इथे फक्त नद्यांना, नाल्यांना, ओढ्यांना, रस्त्यांना पूर आलेला नाही .
आमच्या डोळ्यांना पण पूर आलाय. शेताचाच नाही तर अख्ख्या जिंदगीचा चिखल झालाय आणि मायबाप सरकार पाठीवर थाप टाकून ‘लढत राहा मी तुझ्या पाठीशी आहे .’ म्हणायच्या ऐवजी तोंडात मिठाई कोंबून उत्सव करायला सांगतंय ?
सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय
की जखमेवर मीठ चोळतंय
आंधळा राजा.. हवालदिल प्रजा..