पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी /अभिजीत लेंभे
देऊर – निरीक्षण हाताळणी याद्वारे ज्या प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना प्राप्त होतात त्या त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावतात व हेच ज्ञान कायमस्वरूपी जीवन व्यवहारात त्यांना साहाय्यभूत ठरते असे प्रतिपादन धनंजय चोपडे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांनी श्रीमुधाईदेवी विद्यामंदिर, देऊर येथे एचडीएफसी बँक यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहकार्यातून साकारलेल्या विज्ञान केंद्राच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक या नात्याने बोलताना प्रतिपादित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम होते. याप्रसंगी आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटणचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या विविध उपकरणांची कृतिसह सविस्तर माहिती सादर केली. प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह अभ्यास आत्मविश्वास व हजरजबाबीपणा याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी या विज्ञान केंद्राचा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शाळेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले व प्रत्यक्ष उपकरणाचा वापर करून प्रयोग करण्यातला आनंद अवर्णनीय असतो असे स्व उदाहरणातून सांगितले.
एचडीएफसी बँकेचे जिल्हाप्रमुख योगेश लुंकड यांनी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेला भविष्यातील योजनांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना संकुलातील विविध विकास कामांची पाहणी करून बँकेने केलेल्या आर्थिक सहकार्याचे योग्य विनियोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
उद्घाटन समारंभास एचडीएफसी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी शिवाजी शिंदे,अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन मॅनेजर प्रकाश हांडे व सुधीर सावंत व्यवस्थापन समितीचे माने, सतीश जाधव पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख व प्रा.सुरेश निंबाळकर, शिक्षक प्रतिनिधी आबेदा मोमीन अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रशिक्षक मयुरी भिसे, प्रियांका सावंत, प्रणिता पोळ उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे महाराष्ट्र व गुजरात प्रभारी विक्रम सोळंकी, आभार प्रदर्शन प्राचार्य प्रदीप ढाणे व सूत्रसंचालन प्रा. सचिन दाहोत्रे यांनी केले. कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी, पालक, संस्था प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
