
लोणंद ( प्रतिनिधी ) – खंडाळा तालुक्याच्या जडण घडणीत मोलाचा वाटा असणारे आणि संपूर्ण सातारा जिल्हयातील पत्रकारांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक, महाराणी सईबाई भोसले हौसिंग सोसायटीचे संस्थापक – चेअरमन , माऊली जेष्ठ नागरीक संघाचे कार्याध्यक्ष , लोणंद ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष , जेष्ठ पत्रकार स्व.शंकरराव जाधव ( आप्पा ) यांचा आज शुक्रवार दि. 11 एप्रिल2025 रोजी पाचवे पुण्यस्मरण दिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा.
जेष्ठ पत्रकार शंकरराव जाधव यांचे मुळ गाव मोर्वे ता. खंडाळा तर जन्मभुमी व कर्मभुमी
लोणंदनगरी आहे. आप्पांचा संपूर्ण जीवनाचा प्रवास खडतर व संघर्षमय असाच झाला. शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची किमया आप्पांनी आपल्या कृती, बोलणे आणी विविध क्षेत्रातील कार्यातुन करून दाखवली होती.
जाधव आप्पा या नावातच नावलौकिक निर्माण झाला होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर कोणाचीही री न ओढता जे योग्य व मनाला पटले तरच हो म्हणणे या पद्धतीने वर्तन केले. आप्पांचा स्वभाव स्पष्टोवकता होता . त्यामुळे सहसा राजकीय किंवा अधिकारी मंडळी त्यांना नेहमी दबकुनच असत. परंतु त्यांचा आदरयुक्त दरारा शेवट पर्यत कायम होता. आपल्या पत्रकारकारतेच्या सुमारे पन्नास वर्षाच्या कालखंडात खंडाळा तालुक्यातील विविध समस्यांना वाचा फोडली तर दुष्काळी खंडाळा तालुक्यातील शेतीला पाणी मिळावे म्हणून प्रभावीपणे लिखान केले.
समाजातील विविध घटकामधील लोकांचे प्रश्न अंत्यत प्रभावी, निर्भिड पणे आपल्या पत्रकारतीच्या मांडुन सर्वसामान्याना न्याय देण्याचे काम गेली अनेक वर्ष जेष्ठ पत्रकार स्व. शंकरराव जाधव आप्पा यांनी केले.
आप्पांनी दै. ऐक्य, ग्रामोद्धार, विशाल सह्याद्री, पुढारी, सकाळ, लोकमत, तरूण भारत, शिवसंदेश आदी दैनिकामध्ये खंडाळा तालुक्यातील विविध प्रश्न , समस्या अडचणी प्रभावी व परखडपणे मांडुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. निरा-देवघर, धोम – बलकवडी , एमआयडीसी,आयटीआय, पशुवैदयकिय महाविद्यालय , लोणंद महाविदयालय असे अनेक विकासभिमुख कामे होण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
लोणंद गावात मध्यमवर्गियांना हक्काचे घर असावे म्हणून संस्थापक – चेअरमन शंकरराव जाधव आप्पानी सईबाई भोसले हौसिंग सोसायटीची स्थापना करून शासकीय जागा नाममात्र दरात मिळऊन देऊन 84 कुटुंबांना आपले हक्काचे घर निर्माण करून दिले.
आपांनी शिवसंदेशकार माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांच्या बरोबर राज्य पातळीवर पत्रकार संघटनेमध्ये काम केले होते.तर खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना करून पत्रकारांना संघटीत केले होते. खंडाळा तालुका व लोणंद या ठिकाणी पत्रकार भवन व्हावे यासाठी त्यांचा गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुरू होता.
माऊली जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले.जेष्ठ नागरीका साठी विरंगुळा केंद्र व नाना – नानी पार्क व्हावे यासाठी त्यांचा गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुरु आहे.
पत्रकार भवन व विरंगुळा केंद्र ही दोन्ही लोणंद नगरपंचायतीच्या माध्यमातुन अंतिम टप्यात आली आहेत.
आप्पांना ग्रामोद्धाररकार कै.रा.बा. जाधव आदर्श पत्रकार , फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचा जेष्ठ पत्रकार पुरस्कार लोणंद जेष्ठ नागरिक संघाचा आदर्श पिता पुरस्कार , मयुरेश्वर मित्र मंडळाचा लोणंद भूषण ,लोणंद फाऊन्डेशनचा लोणंद गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
समाजासाठी शेवटपर्यत झटणाऱ्या जाधवआप्पांना पाचव्या पुण्यस्मरण दिनी भावपूर्ण श्रद्धांजली….