म्हसवड … प्रतिनिधी
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे विद्यार्थ्यांना सात्विक आहाराचे महत्त्व समजावे तसेच दुर्मिळ असणाऱ्या विविध रानभाज्याची ओळख व्हावी या उद्देशाने वैशिष्ट्यपूर्णरित्या आयोजित केलेला रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेत वैशिष्ट्यपूर्ण , सकस व दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्याचा महोत्सव आयोजित केला होता. रानभाज्या महोत्सवाचा शुभारंभ संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांचे हस्ते करण्यात आला . यावेळी संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, पालक प्रतिनिधी ॲड. सचिन रुपनवर, यांचे सह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हणाले आपल्या राज्याच्या व देशाच्या जंगली व पहाडी भागात हजारो रानभाज्या आहेत. सदर भाज्या दुर्मिळ व दुर्लक्षित आहेत मात्र त्या मानवी आहारामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. सदर भाज्या कच्च्या,उकळून ,शिजवून , भाजून इत्यादी स्वरूपात सेवन केल्या जातात. मानवी आहारात धान्य, कडधान्य, फळे याबरोबरच रानभाज्या सुद्धा महत्त्वाच्या असून त्या सात्विक असल्याने त्यांची जोपासना व आहारातील त्याचा वापर वाढविणे गरजेचे असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी रानभाज्या महोत्सव आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. इथंच आहे पण दिसत नाही, तसेच जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे आपल्या परिसरात सकस अन्नघटक असणाऱ्या भरपूर रानभाज्या उपलब्ध असून त्याचे आहारातील प्रमाण वाढण्यासाठी तसेच या भाज्याची तोंड ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा सुलोचना बाबर यांनी व्यक्त केली.
या उपक्रमात शाळेतील निवडक दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. या महोत्सवात शेवगा, भुई आवळा, तरोटा, चिघळ, सराटा,उंबर, गुळवेल , केळफुल, बहावा,आघाडा, केना, अंबाडी, अळू, कुरडू, बांबू, तांदूळजा , काटे माठ , खापरफुटी, पातर, ओवा , टाकला, आंबुशी, वाकळ इत्यादी दुर्मिळ दुर्लक्षित रानभाज्या विद्यार्थ्यांनी सजावट स्वरूपात महोत्सवात मांडलेल्या होत्या. या निमित्ताने विद्यार्थ्यांनाही रानभाज्याची चांगल्या प्रकारे तोंड ओळख झाली.
या निमित्ताने दुर्मिळ रानभाज्या महोत्सवात अनेक शिक्षकांनी सक्रिय सहभागी होऊन विविध रानभाज्यांचे स्टॉल मांडले होते. यावेळी गुणवंत शिक्षक व विद्यार्थी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या निमित्ताने कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी रानभाजीची उपलब्धता , विविध प्रजाती, मानवी आहारातील महत्त्व इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली.
क्रांतिवीर शाळेत एक आगळावेगळा उपक्रम राबवल्याबद्दल अनेक पालकांनी
समाधान व्यक्त केले.
क्रांतिवीर शाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न.