फलटण शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा – माजी नगरसेवक अशोक जाधव यांची मागणी

Spread the love

फलटण शहरातील मोकाट कुत्र्यांचा व बेवारस जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा – माजी नगरसेवक अशोक जाधव यांची मागणी

फलटण वार्ताहर :
फलटण शहरात दिवसेंदिवस मोकाट भटक्या कुत्र्यांचा व बेवारस जनावरांचा त्रास वाढत चालला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात माजी नगरसेवक श्री. अशोकराव जाधव यांनी नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहरातील विविध चौकात, गल्ल्या-रस्त्यांवर आणि बाजारपेठेत 10 ते 15 कुत्र्यांची टोळकी दिवसरात्र वावरताना दिसतात. तसेच भर रहदारीच्या मुख्य रस्त्यावर, चौकात व बसस्थानकाजवळ बेवारस गुरांचे कळप बसून रहदारीत अडथळा निर्माण करतात. यामुळे वाहनचालकांना सतत धोका निर्माण होतो.

शहरातील लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी जाणारे नागरिक तसेच सर्वसामान्य पादचारी यांना या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अलीकडच्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर झडप घालून जखमी करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. “यापुढे जर एखाद्या लहान मुलाचा किंवा निरपराध नागरिकाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत त्यांनी नगरपरिषदेचे लक्ष वेधून सांगितले की, “नागरिकांच्या जिविताचा प्रश्न आहे. नगरपालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये. आठ दिवसांच्या आत या समस्येवर ठोस उपाययोजना करून भटकी कुत्री व बेवारस जनावरे हटविण्यात यावी.”

अन्यथा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या महायुतीच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. जाधव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!