औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे
औंधमार्गे फलटण–आदमापूर अशी नवी एस.टी. बससेवा 14 ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, भाविकांना थेट आणि सोयीस्कर प्रवासाची नवी सुविधा मिळाली आहे. फलटण–पुसेगाव–औंध–पुसेसावळी–कराड–कोल्हापूरमार्गे धावणारी ही बस थेट आदमापूरपर्यंत जाणार आहे.
फलटण आगार प्रमुख श्रीमती सुफिया मुल्ला यांनी प्रवाशांच्या मागणीची दखल घेत ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी ग्राम विकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांचे थोरले बंधू मा.अंकुश गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करत वरिष्ठ संबंधित अधिकारी वर्गाला तशी माहिती दिली या मार्गावर दरवर्षी असंख्य भाविक आदमापूरला दर्शनासाठी जातात. मात्र, थेट बससेवा नसल्यामुळे प्रवासात अडथळे येत होते. आता ही सेवा सुरू झाल्यामुळे भाविकांना अखंड, सुरक्षित आणि वेळेवर प्रवास करता येणार आहे.
या बससेवा सुरू करण्यासाठी औंधचे बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक धनाजी माळी, प्रा. प्रमोद राऊत, सचिन सुकटे, सचिन पवार आणि सलमान पटवेकरी यांनी सुद्धा फलटण डेपोकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
फलटण ते आदमापूर – दररोज दुपारी 12.30 वाजता फलटण येथून सुटणार आणि सायंकाळी 6.30 वाजता आदमापूर येथे पोहोचणार.
आदमापूर ते फलटण – दुसऱ्या दिवशी सकाळी 7.00 वाजता आदमापूरहून सुटणार आणि दुपारी 1.00 वाजता फलटण येथे पोहोचणार.
औंध येथे या बसचे आगमन होताच उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बसचे पूजन करून, चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी व भाविकांनी या नव्या सेवेबद्दल आनंद व्यक्त करत, ही सेवा नियमित आणि वेळेवर सुरू राहावी, अशी अपेक्षा मांडली.