। पंढरपूर, प्रतिनिधी
संत नामदेव महाराज 675 वा संजीवन समाधी सोहळा….
श्रीक्षेत्र पंढरीत दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
अॅड.महेश ढवळे; मुख्यमंत्री फंडणवीसांसह अनेक मंत्री, महाराज मंडळीची उपस्थिती
। पंढरपूर, प्रतिनिधी
भागवत धर्माचे प्रसारक, आद्य किर्तनकार, श्री विठ्ठलाचे लडिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 जुलै रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, खासदार-आमदार, महाराज मंडळी तसेच मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे संस्थापक अध्यक्ष व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांनी दिली.
श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माहिती देण्यासाठी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एकसंघाचे राष्ट्रीय सचिव व केशवराज संस्थेचे प्रमुख रुपेश खांडके, एकसंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नंदकुमार कोसबतवार, प्रदेशाध्यक्ष व संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे, पश्चिम महाराष्ट्राचे धनंजय गोंदकर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रथमेश परांडकर, वैभव सदावर्ते, प्रभु सोनवणे आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित पत्रकारांचे स्वागत पत्रकार प्रशांत माळवदे यांनी केले. तर सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पंढरपूर शिंपी समाजाचे विश्वस्त राजेश धोकटे सर यांनी केले.
यावेळी माहिती देताना अॅड. महेश ढवळे म्हणाले, संत नामदेव महाराज व परिवाराच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, श्री केशवराज संस्था पंढरपूर, संत नामदेव महाराज भक्त परिवार, नामदास महाराज परिवार, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्यावतीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 जुलै रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या समवेत पालकपंत्री जयकुमार गोरे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिणीनाथ महाराज औसेकर, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, माजी आ. प्रशांत परिचारक, अभिनेते गोविंद नामदेव, अनेक मंत्री, खासदार, आमदार, महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या संत नामदेव मंदिर येथे पौर्णिमेपासून धार्मिक कार्यक्रम व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. प्रमुख कार्यक्रमाच्या अ्रंतर्गत सोमवार दि. 21 रोजी एकादशीनिमित्त दिंडीची नगर प्रदक्षिणा होणार आहे. मंगळवार दि. 22 रोजी द्वादशी दिवशी क्षीरापत कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 23 जुलै रोजी मुख्य दिवशी सकाळी 9 ते 12 या वेळेत संत नामदेव मंदिर येथे ह.भ.प. नामदास महाराज यांचे संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित किर्तन होणार आहे. त्यानंतर गुलाल पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच संत नामदेव मंदिर, संत नामदेव पायरी व श्री विठ्ठल मंंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेणार आहे. तसेच मानकर्यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर एल.आय.सी. कार्यालयासमोरील आरती मंडप मनमाडकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराज कुटुंबातील 5 महाराजांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संत पूजन होणार आहे. यावेळी मान्यवर मंत्री, महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर संत नामदेव मंदिर येथे सर्वांना मुक्तद्वार महाप्रसाद देण्यात येणार आहे.
तसेच दि. 23 व दि. 24 जुलै असे 2 दिवस दिवसभर शिंपी समाजातील बांधवांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 24 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 वाजता ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे किर्तन होईल. सायंकाळी 6 वाजता शाही दिंडी लवाजम्यासह संत नामदेव महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होणार आहे. वरील सर्व कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शिंपी समाज बांधव, संत नामदेव भक्त मंडळी, महाराज मंडळी उपस्थित राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त नामदास महाराज परिवार व नामदेव महाराज फड श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, श्री. केशवराज संस्था पंढरपूर, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर, युवक संघटना, संत नामदेव महिला भजनी मंडळ परिश्रम घेत आहेत. सदर पत्रकार परिषदेस पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट
संत नामदेव स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार
श्रीक्षेत्र पंढरी नगरीत चंद्रभागा नदीच्या पलीकडे भक्तीसागर येथे संत नामदेव महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारणीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी रेल्वे विभागाची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून सुमारे 10 एकर जागेवर स्मारक उभारण्यात येणार आहे. अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून स्मारकाचे काम लवकरच सुरु करण्यातत येणार असल्याचे अॅड. महेश ढवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट….
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनमाडकर हॉल येथे कार्यक्रम
Leave a Reply