सांगली, दि. 21 (जि. मा. का.) :
महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, यांच्याकडील शासन निर्णय दि. 20 जून 2025 अन्वये दिनांक 27 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करावयाच्या अर्जाचा नमुना शासन निर्णयामधील परिशिष्ट-अ मध्ये दिलेला आहे. स्पर्धेचा अर्ज विहित नमुना प्रपत्रामध्ये भरून तो ऑनलाईन पध्दतीने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेल आयडीवर दि. 26 ऑगस्ट 2025 पूर्वी सादर करायचा असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हास्तरीय गणेशोत्सव पुरस्कार समितीचे सदस्य सचिव अशोक पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांची परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे करण्यात येईल. मागील सलग 2 वर्षामध्ये पुरस्कार प्राप्त मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. दि. 20 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निकषाप्रमाणे निवड होणाऱ्या राज्यातील पहिल्या 3 विजेत्या मंडळांना राज्य शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.
राज्यस्तरीय पारितोषिकांचे स्वरुप पुढीलप्रमाणे - प्रथम क्रमांक रु.7,50,000/-, व्दितीय क्रमांक रु. 5,00,000/- व तृतीय क्रमांक रु. 2,50,000/-.
जिल्हास्तरीय पारितोषिकांचे स्वरुप पुढीलप्रमाणे - प्रथम क्रमांक रु.50,000/-, व्दितीय क्रमांक रु.40,000/- व तृतीय क्रमांक रु.30,000/-.
राज्यस्तरावरुन निवड झालेल्या मंडळांस वगळून जिल्हास्तरीय समितीने राज्यस्तरीय समितीकडे शिफारस केलेल्या जिल्ह्यातील प्रत्येकी 1 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रु. 50,000/- चे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, यांचेकडील शासन निर्णय दिनांक 20 जून 2025 व 20 ऑगस्ट 2025 मधील तपशील पाहण्यात यावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.