म्हसवड वार्ताहर
मुलांचे ऍडमिशन करण्याच्या बहाण्याने शाळेत येऊन शिक्षिकेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून जमिनीत पुरून ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी मनोज सुरेश घमंडे (वय 40 वर्ष ) राहणार धामणी यास अटक केली आहे.
शाळा सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिकेच्या पर्स मधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अनोळखी आरोपीस अवघ्या 2 तासात अटक करून चोरीस गेलेला सोन्याचा शंभर टक्के जमिनीत पुरून ठेवलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना यश आले आहे.

हकीकत
*जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात त्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात इसमाने चोरून घेऊन गेले बाबत चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असता शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये एक अज्ञात इसम शिक्षकांच्या स्टाफ रूम मध्ये येऊन त्यांनी या शिक्षिकेच्या पर्सच्या आतमध्ये ठेवलेल्या पॉकेटची चैन उघडी करून त्यामधील सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेलेले दिसले. या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज मधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणी या गावातील मनोज सुरेश घमंडे वय 40 वर्ष हा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्याला पकडण्याकरिता जाऊन त्याकरिता तांत्रिक बाबींचा देखील उपयोग करून सदर आरोपीस शीताफिने पाठलाग करून पकडल्यानंतर त्याला चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने हे धामणी गावातील मोकळ्या पटांगणामध्ये खड्डा करून पुरून ठेवले असे सांगितल्यानंतर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले असून अवघ्या दोन तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आलेले असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल या आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. या आरोपीकडे या चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता काल सर्वत्र चालू झालेल्या शाळेच्या अनुषंगाने हा व्यक्ती मुलांच्या ऍडमिशनच्या बहाण्याने या शाळेमध्ये आलेला होता. व त्याने पालक मेळावा चालल्याचे बघून संधी साधून शिक्षक स्टाफ रूम मध्ये जाऊन तिथे ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरलेले होते.
परंतु सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे तात्काळ तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 2 तासात हा गुन्हा उघडकीस आल्यामुळे तक्रारदार यांचे चोरीस गेलेले दागिने त्यांना मिळाले असून आरोपीस अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात हजर केलेले आहे. चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या दोन तासात लावून सर्व सोन्याचे दागिने परत मिळाल्यामुळे सर्वत्र म्हसवड पोलिसांचे कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार,अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव यांनी या कारवाईत भाग घेतला.