(अजित जगताप )
सातारा दि: शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य , संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोडोली जिल्हा परिषद शाळेतील सुविचाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हसा खेळा आणि शिस्त पाळा या वाक्याने उपमुख्यमंत्र्यासह अनेकांना संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव २०२५- २६चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. सातारा जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माझी शाळा आदर्श शाळा उपक्रांतर्गत उभारण्यातत आलेल्या कोडोली जिल्हा परिषद शाळेचेही उद्घाघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे आ. महेश शिंदे, भाजपचे आ. मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीतसिंह भोसले, संदीप शिंदे,यांचसह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे, आनंददायी शिक्षण, मुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा व संघटीत व्हा असे शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले . डॉ आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधोरेखित केले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न केला त्यावेळी एक विद्यार्थी उठला. हा धागा पकडून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार व्हाल. मग आम्ही कुठे जायचे ? असा विनोद केला. तेव्हा हास्य पिकला.
कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले.मुलांनो खूप अभ्यास करा मोठे व्हा असे आवाहन केले . दरम्यान, शाळा प्रवेश दिनाच्या दिवशीच हसा खेळा आणि शिस्त पाळा या सुविचाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा सुविचार अनेकांनी वाचून राज्यकर्त्यांना संदेश दिल्याच्या भावना निर्माण झाल्या. कारण, राजकीय पटलावर बऱ्याच गोष्टी घडत असल्याने या ठिकाणी आता राजकीय शिस्तीची गरज आहे. हे मात्र या सुविचाराने अधोरेखित केले. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अनेकदा वाहतुकीत अडथळा होतो शिस्त पाळली जात नाही. एकमेकांवर टीका टिपण करण्याचा खेळ खेळला जात असतो. त्यामुळे कोडोली शाळेतील सुविचाराला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्यांच्या समोरच वृक्षारोपण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
कोडोली जिल्हा परिषद शाळेतील सुविचार आणि वृक्षारोपण (छाया– अजित जगताप, सातारा)
