माण कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

Spread the love

म्हसवड… प्रतिनिधी
माण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत वरिष्ठांनी लादलेला महत्त्वपूर्ण निर्णय न रुचल्याने माण तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी तडकाफडकी राजीनामे दिले होते. राजीनामा दिलेले महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विकास गोंजारी, काँग्रेस पदाधिकारी व लोणारी समाज प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब आटपाडकर, जिल्हा ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष दाऊद मुल्ला, तालुका काँग्रेस चिटणीस वसंतराव शिर्के यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, विटा खानापूरचे आमदार सुहास बाबर, प्रदेश सचिव राम रेपाळे व संजय मोरे, सातारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शरद कणसे, तसेच सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, शिवसेना समन्वयक पांडुरंग पाटील, नगरसेवक किरण लांडगे, जावली तालुकाध्यक्ष समीर गोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा घेऊन मी व माझे सहकारी महाराष्ट्रात शिवसेना वाढविण्याचे काम करीत आहोत. पक्षात येणाऱ्या सर्वांचा सन्मान ठेवून त्यांना सर्वांगीण ताकद देणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात सध्या तुलनात्मक दृष्ट्या सर्वात जास्त इनकमिंग शिवसेनेत सुरू असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. या निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आपुलकीने चौकशी करून त्यांना पक्ष संघटन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच माझी तुम्हाला पक्ष संघटन कार्यासाठी खंबीर साथ राहील अशी ही ग्वाही दिली.
यावेळी बोलताना प्रा. विश्वंभर बाबर म्हणाले यानिमित्ताने मिळालेल्या संधीचं सोनं करून माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्याचे प्रभारी शरद कणसे व सह प्रभारी एकनाथ ओंबळे ,सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव माण तालुकाध्यक्ष समीर जाधव व बाळासाहेब मुलाणी यांच्या सहकार्य व मदतीतून शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची ग्वाही प्रा. बाबर यांनी यावेळी दिली. यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या अनेक मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!