
म्हसवड (प्रतिनिधी )
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत च्या मनमानी व सग्या सोयरेच्या सोयीच्या राजकारणाला कंटाळून माण तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचे राजीनामे दिले असून यानिमित्ताने माण तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे.
गेले काही वर्षे सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या परिस्थितीला कंटाळून प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी आपल्या पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवला असून त्याची प्रत महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे यांनाही पाठविली आहे.
प्राध्यापक विश्वभर बाबर यांच्याबरोबरच जिल्हा काँग्रेसचे चिटणीस तसेच म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक विकास गोंजारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सातारा यांच्याकडे पाठवला आहे. याबरोबरच माण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष आर पी काटकर , सातारा
जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष दाऊद मुल्ला , तसेच
माण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे चिटणीस व किसान काँग्रेसचे माण तालुका उपाध्यक्ष वसंतराव शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सातारा यांच्याकडे दिला आहे. सातारा जिल्हा काँग्रेस संघटना अंतर्गत गेली काही वर्षे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष असून जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष दिशाहीन झालेला असल्याने कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या राजीनामा सत्रामुळे माण तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसला धक्का बसला असून भविष्यातही पक्षाची प्रचंड संघटन हानी होणार आहे. जिल्हास्तरावर निर्णय घेताना ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलने , एकाधिकार पणे निर्णय घेणे, सगे सोयरे व नात्यागोत्यातील व्यक्तीला पदनियुक्तीमध्ये प्राधान्य देणे तसेच केवळ कागदी घोडे नाचवणाराला संघटनेत मोठे बक्षीस देणे यामुळे ज्येष्ठ व निष्ठावंत अनेक पदाधिकाऱ्यांची कुचुंबना होत असल्याने अनेक पदाधिकारी गत काही वर्षापासून नाराज होते. नेत्यांच्या जवळपासचा लाचार कोंडाळा तसेच इतर राजकीय पक्षाबरोबर दोन डगरी वर संबंध असणारे पदाधिकारी यामुळे काँग्रेस डागाळला असल्याने पक्षांमध्ये तीव्र नाराजी होती.त्यातच पक्षाने नुकताच घेतलेला महत्त्वाचा निर्णय अनेकांना रुचला नसल्याने माण तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी नाट्याच्या माध्यमातून आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत.