
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
माण-खटावचे आमदार व राज्याचे मंत्री मा. जयकुमार गोरे यांचे थोरले बंधू अंकुशभाऊ गोरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपासून औंध आणि परिसरातील जनतेशी जिव्हाळ्याची नाळ जोडली आहे. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी समाजकार्याला प्राधान्य देत सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे.
गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवणे, तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम राबवणे अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या कामामुळे अनेक रखडलेली प्रकरणे मार्गी लागली असून, लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी ते अहोरात्र झटताना दिसतात.
“राजकारण हे निवडणुकीपुरते असते, समाजाचा खरा विकास हा कायमस्वरूपी असावा,” अशी त्यांची कार्यशैली असून त्यातून त्यांची समाजाभिमुख बांधिलकी अधोरेखित होते. पाणी प्रश्न, रोजगार, शिक्षण यांसारख्या मुलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केल्याने औंध परिसरात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे.
औंधमधील नागरिकांमध्ये अशा प्रकारच्या सक्रिय आणि संवेदनशील नेतृत्वाची गरज होती आणि ती यमाई देवीच्या कृपेमुळे अंकुशभाऊंच्या रूपाने पूर्ण झाल्याची भावना आज जनतेतून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यामुळे ‘होत नव्हते ते होऊ लागले’ अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देताना दिसत आहेत.