प्रतिनिधी बार्शी
लेखक समाजाचे प्रतिबिंब रेखाटतो. त्याचे अनुभवविश्व विविधांगी दृष्टिकोनातून प्रकटते. लेखक लेखनातून लीलया शब्दमंच निर्माण करीत वाचकांपर्यंत पोहोचत असतो,असे मत प्रा.डॉ. राहुल पालके यांनी मांडले. येथील कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी शालेय आंतरवासिता व सरावपाठ प्रात्यक्षिक अंतर्गत आयोजित ‘लेखक आपल्या भेटीला: साहित्यिक मुलाखत’ या कार्यक्रमाचे आयोजन शाह धारसी जीवन मॉडेल हायस्कूल, बार्शी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री एस. बी. काकडे यांनी भूषविले. याप्रसंगी मुख्याध्यापक देवकर , प्रा. डॉ. डिसले सर, मसाप शाखा बार्शीचे अध्यक्ष पां. नि. निपाणीकर हे उपस्थित होते.
पालके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना लेखकाचे विश्व मांडले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील लेखकांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. लेखनप्रक्रिया व त्याचे घटक याविषयी माहिती सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये त्याची रुची वाढेल याचे मार्गदर्शन केले. ‘ती खारुताई’ या कवितेच्या सादरीकरणातून त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. आपल्या शाळेच्या प्रांगणातील चित्रांकित ही कविता विद्यार्थ्यांना आपलेसे करून गेली. याप्रसंगी पालके यांना मुलाखती पर प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये मुलाखतकार अफरोज- जहाँ मुलाणी यांनी त्यांना शैक्षणिक संपदा, साहित्यिक ग्रंथसंपदा लेखन प्रक्रियेविषयीचे अनुभव व प्रेरणा याबाबत प्रश्न विचारले. पालके यांनी या प्रश्नांची उत्तरे देत साहित्यिक विश्वाचा आवाका मांडला. काकडे सरांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करून साहित्यिक विश्वाला दाद दिली.आपल्या अनुभव लेखन स्वरूपात व इतर प्रकारे प्रकट केले पाहिजेत. त्यामुळे साहित्य समाजाला प्रेरणा देईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षिका, बी.एड. प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
लेखक लेखनातून शब्दमंच निर्माण करीत वाचकांपर्यंत पोहोचत असतो: प्रा. डॉ राहुल पालके