राष्ट्रीय हिताचा विचार करून प्रसार माध्यमांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत व्यक्त व्हावे- डॉ.संजय तांबट

Spread the love


पंढरपूर- भारताच्या शेजारी देशांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता भारताच्या राष्ट्रीय हिताचा विचार करून राष्ट्रीय सुरक्षा संदर्भाने योग्य काय आहे? भारतीय जनमानसावर कसा परिणाम होऊ शकतो याचा विचार करून प्रसार माध्यमांनी आपली भूमिका निभावली पाहिजे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.संजय तांबट यांनी व्यक्त केले.
विश्व संवाद केंद्र,पुणे व विठाई बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित माध्यम संवाद परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या परिषदेला स्वेरी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव डॉ.बी.पी.रोंगे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सचिव उज्वल दोशी, माध्यम संवाद प्रांत आयाम सहप्रमुख नरेंद्र जोशी व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाच्या मार्गदर्शिका व कमिन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वूमन पुणे येथील सहाय्यक प्राध्यापिका प्रांजली देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
याप्रसंगी भारतीयत्व राष्ट्रीय सुरक्षा व प्रसार माध्यमे या विषयावर बोलताना तांबट म्हणाले, की आपल्या देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षा व्यवस्थेचा विचार करत असताना आपल्या देशाची या क्षेत्रातील स्वयंपूर्णता निश्चितच वाढलेली आहे, तसेच आपल्या देशातील लोकांचा देशाबद्दल असणारा राष्ट्रीयत्वाचा भाव देखील या सुरक्षेमध्ये महत्त्वाचा आहे. त्यामुळेच भारताच्या शेजारील देशांमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती भारतात कदापिही निर्माण होऊ शकणार नाही. या परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य गोष्टींचा प्रचार प्रसारमाध्यमांनी करणे गरजेचे आहे. राष्ट्रीयत्वाचा विचार प्रसारमाध्यमांनी केला तर भारतीय समाजात सकारात्मक भाव निर्माण होऊ शकेल. या परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा पत्रकारांसाठी कसा उपयोग होऊ शकतो या विषयावर या क्षेत्रातील तज्ज्ञ तंत्रज्ञ प्रांजली देशपांडे यांनी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पत्रकार कृत्रिम बुद्धिमत्तेचा कशाप्रकारे सुव्यवस्थित वापर करू शकतात, याचे फायदे व तोटे काय आहेत, याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याचा वापर करून कोणत्या प्रकारे विमर्श तयार केले जातात, सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर कसा केला जातो अशा अनेक विषयांवर देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यम संवाद जिल्हा आयाम प्रमुख ऍड.महेश वाळूजकर यांनी स्वागत केले. माध्यम संवाद आयाम सहप्रमुख नरेंद्र जोशी यांनी प्रास्ताविक करताना अशा परिषदेची आवश्यकता समजावून दिली. पुणे विभाग सहप्रचार प्रमुख डॉ.सचिन लादे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.बी.पी.रोंगे व उज्वल दोशी यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा प्रचार प्रमुख डॉ.स्वानंद कुलकर्णी यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठाई संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमाला डॉ.रमेश सिद, सुधाकर जोशी, अरिहंत पब्लिक स्कूलच्या प्राचार्या लोखंडे मॅडम या मान्यवरांबरोबरच पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ही परिषद यशस्वी करण्यासाठी संजय कुलकर्णी, ओंकार कापसे, सुनिल जगताप, उमेश टोमके, आनंद नगरकर, बाळकृष्ण डिंगरे, तुकाराम खंदाडे, दत्तात्रय देशमुख, सचिन कुलकर्णी, रविराज सोनार, प्रताप चव्हाण, मंदार केसकर, गणेश कुलकर्णी, वेदांत वांगीकर, नागेश पाटील, समीर कुलकर्णी, रवी ओव्हाळ, डोंबाळे मॅडम, प्रसाद कोत्तूर, रामेश्वर कोरे, सचिन दिंडोरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!