मायणी प्रतिनिधी——–
विटा येथील प्रतिथयश शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी व आंतरराष्ट्रीय दर्जाची फिशर इंडिया कंपनी यांच्या मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या करारानुसार देशभरातील गलाई बांधव व सोने व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक XRF सोने टंच (तपासणी) मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या करारानुसार आज संस्थेचे सभासद असणाऱ्या गलाई बांधवांना या मशीनचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक स्व. प्रतापशेठ दादा साळुंखे हे स्वतः गलाई व्यावसायिक होते. गलाई बांधवांच्या सहकार्यानेच शिवप्रताप मल्टी स्टेटची भक्कम पायाभरणी झाली. दादांची कायमची इच्छा होती की संस्थेमार्फत गलाई बांधवांना मदत व्हावी व त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक साधने उपलब्ध व्हावीत. आजच्या या उपक्रमामुळे त्यांची दूरदृष्टी प्रत्यक्षात उतरली असून संस्थेच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पान लिहिले गेले आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. शेखर साळुंखे व कार्यकारी संचालक अॅड मा. विठ्ठल साळुंखे यांनी गलाई बांधव व सोने व्यावसायिकांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. आजच्या आधुनिक काळानुसार सोन्याची शुद्धता तपासणे आणि ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. या मशीनमुळे गलाई व सोने व्यवसाय अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार असून सभासदांना स्पर्धात्मक ताकद मिळणार आहे. व त्यांचे व्यवसायात यामुळे वाढ होऊन उत्पन्न वाढणार आहे.
यावेळी उपस्थित गलाई बांधवांनीही समाधान व्यक्त करून सांगितले की आजच्या परिस्थितीत ही मशीन व्यवसायासाठी अत्यावश्यक ठरली आहे. शिवप्रताप मल्टी स्टेटने ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्या व्यवसायाला नवे बळ मिळाले आहे तसेच ग्राहकांचा विश्वास टिकविण्यास आणि वाढविण्यासाठी ही योजना अत्यंत मोलाची ठरत आहे.
शिवप्रताप मल्टी स्टेट व फिशर इंडिया यांच्या या संयुक्त उपक्रमामुळे गलाई बांधव व सोने व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून त्यांचे व्यवसाय अधिक सुरक्षित, पारदर्शक व प्रगतीशील होणार आहेत.

या कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन मा. हणमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक मा. विठ्ठलराव साळुंखे, सभासद, अधिकारी व गलाई बांधव श्री. अमोल भोसले, भागलपुर , श्री.निलेश जाधव, नागपुर, श्री.प्रदिप शिंदे, गुजरात, श्री.विशाल शिंदे,आंबेगाव (बू), श्री.मनोज पाटील, राजस्थान इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.