‘ग्रीन कॉरिडॉर’ कोयना विभागात बेसुमार वृक्षतोड, लाकडाच्या मोळ्या रस्त्यावर
(अजित जगताप)
कोयना नगर दि.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या व्याघ्र प्रकल्प लगतच्या पाटण तालुक्यात ग्रीन कॉरिडॉर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे.वनविभाग परवानगी देत असलेले लाकडाच्या मोळ रस्त्यावर दिसत आहे.
अटी व नियम धाब्यावर बसवून पाटण तालुक्यातील लेंढोरी,तळीये, रिसवड,ढाणकल येथे वृक्षतोड झाली आहे.त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश वन विभागाने सार्वजनिक ठिकाणी व भिंतीवर दिला आहे. निसर्ग सौंदर्याने आकर्षित झालेला कोयना विभागात वनविभागाच्या देखरेखी पेक्षा या ठिकाणी लाकडाची वखार आहे की काय? अशी शंका येते.
पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे.कोयना धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कोयना परिसराचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले. तर दुसऱ्या बाजूला वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी सिमेंटचे जंगल उभे राहिलेले आहे.
कोयना खोऱ्यामध्ये आयुर्वेदिक क्षेत्रात महत्व प्राप्त झालेली अनेक औषधी व दुर्मिळ झाडपाला आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रीन कॉरिडॉर असल्याने वन्यजीव वन्य पक्ष्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. वन्य प्राणी व पक्षी यांच्या नैसर्गिक साखळीचा घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करीत आहे. मात्र यावरच सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कुऱ्हाड चालवली जात आहे.
पश्चिम घाट, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प , कोयना अभयारण्य व चांदोली अभयारण्य पर्यंत हा ग्रीन कॉरिडॉर आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध असलेला हा भाग वन्यजीव व पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. विविध पक्षांचे प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात आधिवास या ठिकाणी आहे मात्र कोयना विभागात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे हा “ग्रीन कॉरिडॉर” सध्या धोक्यात आला आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड करणाऱ्या लाकूड तस्करांवर कारवाई करावी. अशी मागणी पर्यावरण प्रेमी नेहमीच करत असतात. मात्र, कुऱ्हाडीचा दांडा गोट्यास काळ अशी वनविभागाची नवीन ओळख झाली आहे.
_

फोटो– पाटण तालुक्यात वन विभागाच्या हद्दीमध्येच तोडलेल्या लाकडाच्या मोळ्या..