
म्हसवड….प्रतिनिधी
शालेय स्तरावर कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी निर्भया पथक अधिक दक्ष ठेवणार असल्याचे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथे निर्भया पथक कार्यवाही बाबत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , डिजिटल मिडिया एबीपी माझा चे निवेदक मंदार गोंजारी, संस्था उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर , प्राचार्य विठ्ठल लवटे जे,डी गोंजारी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर यांचे हस्ते सपोनि अक्षय सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले विद्यार्थ्यांनो तुम्ही खूप नशीबवान आहात.
तुम्हाला हवे असणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधा तुमचे आई-वडील देत आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार दर्जेदार उच्च शैक्षणिक सुविधा सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. या सर्वांचा लाभ घेऊन सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. टीव्ही ,मोबाईल , तसेच उपद्रवी सोशल मीडिया पासून वेळीच दूर राहा. जीवनात जिद्द चिकाटी बाळगा. नेहमी सकारात्मक रहा. अभ्यासाबरोबर खेळाला सुद्धा महत्त्व द्या. आई वडील व गुरुजनाबाबत आदर बाळगण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले.
पुढे बोलताना अक्षय सोनवणे म्हणाले सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळा. त्यापासून चार हात लांब रहा. अन्यथा तुमच्या जीवनाचा विध्वंस ठरलेला आहे.
शालेय मुलींची छेडछाड, त्या बाबतचे कठोर कायदे , कायद्याच्या अंमलबजावणीमुळे टवाळखोर प्रवृत्ती तसेच रोड रोमियोंच्या आयुष्याचे होणारे वाटोळे याबाबतही अक्षय सोनवणे यांनी माहिती दिली. शालेय स्तरावरील मुलींच्या संरक्षणासाठी स्वसंरक्षणाचे धडे देणे तसेच निर्भया पथकाच्या माध्यमातून आपण सुयोग्य कायदा व्यवस्था राखण्यासाठी अधिक दक्ष राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या उपक्रमाशीलतेबद्दल तसेच उच्च गुणवत्तेबद्दल सपोनी सोनवणे यांनी गौरव उद्गार काढले. यावेळी संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर यांनी संस्थेअंतर्गत सुरू असणारे विविध उपक्रमाची माहिती दिली. प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी सूत्रसंचालन केले तर मान्यवरांचे आभार प्राध्यापिका पल्लवी देशमुख यांनी व्यक्त केले.
