
म्हसवड… प्रतिनिधी
म्हसवड येथील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून नगरपालिका प्रशासन व बांधकाम उपविभाग दहिवडी यांच्यातील अंतर्गत टोलवा टोलवीमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतं आहे . या ठिकाणचा प्रवास अक्षरशा जीव मुठीत घेऊन करावा लागत असल्याने विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून याप्रकरणी जबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
म्हसवड नगरपालिके अंतर्गत चा शिक्षक कॉलनी व आसपासचा परिसर नगरपालिकेला सर्वात जास्त मालमत्ता कर देणारा भाग आहे. चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी पाण्याचा टाकी दरम्यानच्या रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती करण्यासाठी रस्ता अनेक ठिकाणी खोदलेला आहे. या रस्त्याकडेने पिण्याचे पाणी पाईप पुरण्यासाठी खोल चारीही काढलेले आहे. सदर सुरू केलेले काम गेले महिना झाले बंद आहे. या चारीमुळे रस्त्याची पूर्ण वाट लागली असून वाहन चालकासाठी ही चारी जीवघेणी ठरत आहे. या रस्त्यावरून दोन शाळा, महाविद्यालयाचे अंदाजे चार हजार विद्यार्थी तसेच स्थानिक प्रवासी ये जा करीत असून अपूर्ण चारीमुळे अनेकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार काम अर्धवट सोडून गेलेला आहे. ठेकेदार नगरपालिके वर व नगरपालिका ठेकेदारावर परस्पर आरोप प्रत्यारोप करीत आहे. नगरपालिकेने पाणीपुरवठ्याची पाईप पुरण्याची चारी खोदून ठेवलेली आहे. याच रस्त्यावरील अर्धवट कामामुळे पोलीस स्टेशन आसपासच्या परिसरात धुळीच्या साम्राज्यामुळे वाहनधारक, स्थानिक व्यापारी, रहिवासी तसेच खुद्द पोलीस स्टेशन मधील कर्मचारी सुद्धा त्रस्त झालेले आहेत. नगरपालिका प्रशासन आणि बांधकाम विभाग दहिवडी यांच्यात अंतर्गत खोट्या मोठेपणाचा संघर्ष सुरू आहे. एकमेकांवर आरोप केले जात आहेत. मात्र यात भरडला जातोय सामान्य रहिवाशी व नागरिक. हे काम तातडीने पूर्ण करायचे नव्हते तर चारी कशासाठी खोदली ? रस्ता दुरुस्तीच्या कामाला ठेकेदार मलमपट्टी लावून गेला. त्याला विचारणारा कोण आहे की नाही ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या कामाच्या पाठपुरासाठी नागरिकांची शिष्टमंडळ नगरपालिका प्रशासनाला भेटले तिथे केवळ या शिष्ट मंडळाची बोळवण झाली. पिण्याच्या पाण्याची अपुरी चारी तसेच रस्ता दुरुस्तीच्या कामामध्ये तातडीने योग्य ती कार्यवाही न झाल्यास, याप्रकरणी दिरंगाई व हलगर्जीपणा करणाऱ्या विरुद्ध माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे दाद मागणार असल्याचा इशारा कृषिरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी दिला आहे.
