
म्हसवड…प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन परिवहन विभागातर्फे नव्याने सुरू केलेल्या विविध वाहनासाठीच्या एच एस आर पी नंबर प्लेट वाहनधारकांना पुरवण्याची सुविधा म्हसवड येथे सुरू व्हावी अशी मागणी प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील जानेवारी 2019 अगोदर च्या वाहनांना एच एस आर पी प्रकारची नंबर प्लेट नव्याने बसवण्याचा आदेश राज्य परिवहन विभागाने जारी केला आहे. या योजनेअंतर्गत माण तालुक्यासाठी केवळ दहिवडी येथे केंद्र नियुक्त केले आहे. माण तालुक्यात दहिवडी पंचक्रोशीपेक्षा म्हसवड पंचक्रोशीत वाहनांची संख्या जास्त आहे. विविध वाहनासाठी सदर नंबर प्लेट बसवण्यासाठी प्रथम ऑनलाईन करून मिळालेल्या नियुक्त तारखेला त्या ठिकाणी वाहन घेऊन जावे लागते. या प्रकारात प्रत्येक वाहना पाठीमागे वेळ, इंधन, मनुष्यबळ व पैसा त्याचा अपव्यय होत असून वाहनधारकाची प्रचंड गैरसोय होत आहे. म्हसवड परिसरातील हजारो वाहनधारकांना दहिवडी येथे जाणे अडचणीचे व खर्चाचे आहे. तसेच हिंगणी, कारखेल, शेनवडी येथून दहिवडी ला जाणे अंतर खूपच लांबचे पडत आहे. म्हसवड परिसरातून दुचाकी पेक्षा चार चाकी मोठे वाहन, ट्रक, स्कूल बस, टेम्पो व तत्सम प्रकारातील वाहन दहिवडी येथे घेऊन जाणे खर्चाचे होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच सदर नंबर प्लेट बसवून घेण्याचा कालावधी केवळ 30 जून पर्यंत शेवट आहे.
म्हसवड परिसरातील वाहनधारकांची गरज लक्षात घेता सदर नंबर प्लेट पुरविण्याचे सुविधा केंद्र नव्याने म्हसवड येथे मंजूर होणे गरजेचे आहे. नवीन केंद्र शक्य नसल्यास आठवड्यात तीन दिवस म्हसवड व तीन दिवस दहिवडी अशी पर्यायी सेवा उपलब्ध व्हावी अशी मागणी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.