
शेळवे तालुका पंढरपूर येथील बळीराजा प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारा रानशिवार साहित्य पुरस्कार माणदेशातील सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील दबडे यांच्या ‘ बनगी आणि बिरमुटं ‘ . या कथासंग्रहास जाहीर झाला आहे .
मंगळवारी १ एप्रिल रोजी पंढरपूर तालुक्यातील खेडभाळवणी येथे होणाऱ्या रानशिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात दबडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात येणार आहे . माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील , सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत , कृष्णा गोदावरी पंढरपूरचे संचालक संदिप नळंदवार, जेष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील , सासवडचे आयुर्वेदाचार्य बाबूशेठ पांडकर बळीराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाजरे तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत दबडे यांना सन्मानपूर्वक पुरस्कार दिला जाणार आहे .
दबडे यांच्या ‘ बनगी आणि बिरमुटं ‘ . या कथासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते विटा ग्रामीण साहित्य संमेलनात झाले होते . माडगुळे येथील शिदोरी साहित्य संमेलनात या पुस्तकावर परिसंवाद रंगला होता . नुकताच या पुस्तकाला फलटणचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कारही मिळाला आहे . या पुस्तकात बदलत्या माणदेशाचे चित्रण केले असल्याने हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे . सुनील दबडे यांची पाच पुस्तके प्रसिद्ध असून त्यांना यापूर्वीही राज्यातल्या प्रतिष्ठेच्य साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . व्याख्याते असलेल्या दबडे यांचे अनेक साहित्यिक कार्यक्रम आकाशवाणी व दूरदर्शनवरून प्रसारित झाले आहेत . दबडे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .