बाळासाहेब बागवान यांचा आज स्मृती दिन…!
ते गेले तेव्हाची पोस्ट पुन्हा एकदा …..!!!
बागवान साहब,बहोत याद आओगे…!
पेटलेले पाणी अखेर आटले …बाळासाहेब बागवान गेले !
काळ मोठा संघर्षाचा होता .खंडाळा तालुक्यातील माय माऊल्या पाण्यासाठी उन्हातान्हात हंडा आणि कळशा घेऊन मैलो न मैल चालायच्या .लेकरं बाळ पाण्यासाठी वण वण करायची.दुष्काळी भागातील जनता हैराण होती .आमच्या सारखी हजारो शाळकरी मुलं आधी पाणी नंतर शाळा असा रोजचा दिनक्रम घेऊन जगायची .या कालावधीत मुस्लिम समाजातील एक तरुण खंडाळ्या च्या पाण्यासाठी पेटला होता .बाळासाहेब बागवान या लढाऊ कार्यकर्त्याने घराघरात पाणी पेटवले होते .खंडाळयाला पाणी मिळाले पाहिजे या एका ध्येयाने बाळासाहेब बागवान यांनी पाणी पंचायत उभी केली .गावा गावातील तरुण पंचायतीचा भाग केले .नंतरच्या काळात कृष्णा खोऱ्याचे पाणी खंडाळयात आले त्यात बाळासाहेबांनि उभा केलेला लढा ही कारणीभूत ठरला .राज्याच्या वाटयाचे पाणी अडले पाहिजे या साठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न चालवले होते .या कालावधीत मी पुढारी तुन कृष्णा खोऱ्यावर जळजळीत मालिका लिहिली होती .मालिका वाचून बाळासाहेबांचा फोन आला .’ मला अभिमान वाटतो तुमचा हरीष .मातीचे पांग फेडाल ,लिहीत रहा ‘.मला ही भरून आले होते तेव्हा .नंतर सातत्याने आम्ही बोलत राहिलो .समान विचारसरणी मुळे बागवान साहेब मला कायमचे जवळचे वाटायचे .पुढारी च्या एका वर्धापन दिना ला मी आवर्जून चळवळीत काम करणाऱ्या हातांचा गौरव केला .डॉ भारत पाटणकर यांचा सन्मान केल्यावर बागवान साहेबांच्या डोळ्यात पाणी आले . मी बाळासाहेबाना ही बोलवले .मला थांबवत म्हणाले , डॉ भारत पाटणकर यांचा सन्मान म्हणजे समस्त पाणी चळवळी चा सन्मान मी त्यातच येतो ‘ मोठा दर्यादिल माणूस होता हा !
अलीकडे ते फेसबुकवर लिहू लागले होते .लोणंद चा जुना इतिहास मांडत होते .मी त्यावर कमेंट केली होती ‘तालुक्याचा जुना इतिहास लिहायला घ्या .नव्या पिढीला जुना दुष्काळ समजायला हवा .’कमेंट वाचून त्यांचा फोन आला .तासभर बोलत होते ,जुना इतिहास सांगत होते ,पाण्याची कहाणी मांडत होते .मी ही थक्क होऊन ऐकत होतो .तुमच्या पिढीने काँग्रेस चा विचार पुढे नेला पाहिजे असे म्हणाले .रात्री फोन आला ,’बाळासाहेब गेले ‘ . जातीधर्माच्या पलीकडचा माणूस होता हा .अखेरच्या क्षणापर्यंत लढतच राहिला .कष्टकरी जनतेसाठी रान पेटवत राहिला बाळासाहेबांच्या अंत्यविधीसाठी जाताना खिडकीतून एक नजर वाहणाऱ्या कालव्यात गेली आणि त्यात बाळासाहेबांची प्रतिमा असल्याचा भास झाला .आता जेव्हा जेव्हा खंडाळयातून वाहणारे पाटाचे पाणी दिसेल तेव्हा तेव्हा बाळासाहेब तुमची आठवण येईल .
तुंम्ही पेटवलेले पाणी आज अखेर आटले
पण लाखो जनतेच्या डोळ्यात तुमच्या जाण्याने साठले .!
बागवान साहब ,बहोत याद आओगे !
—-हरीष पाटणे ,वृत्तसंपादक ,पुढारी सातारा .