
वावरहिरे (अनिल अवघडे) -येथील श्री पाणलिंग पालखी कावड याञेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री पाणलिंग केसरी भव्य बैलगाडा शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी येथील मैदानावर सातारा ,सांगली ,सोलापुर जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले बैलगाडामालक आणि शौकिनांची मोठी गर्दी केली होती.
भिर्र… भिर्र… झाली… झाली… झाली… वाह रे पठ्ठ्या… मैदान मारलं, अशा आवेशपूर्ण आरोळ्यामध्ये बैलगाड्यांच्या चित्तथरारक शर्यती झाल्या. या शर्यतीमध्ये पहिल्या सात क्रमांकास लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली. वावरहिरे येथील राजा आणि लक्ष्या या श्री पाणलिंग प्रसन्न कै. एम. के. पांढरे या गाडीने श्री पाणलिंग केसरी होण्याचा बहुमान फटकावला.
उत्कृष्ट बैलगाडा चालकांना रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. विजेत्या बैलगाडा मालकांना उपसरपंच नामदेव चव्हाण,अशोक आनेकर, वसंत पाढरे, युवा नेते शंकर गोसावी,हेमाकांत बुट्टे,दिपक शिंदे, लखन खुस्पे ,संजय खुस्पे आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
या शर्यतीमध्ये चारशेपेक्षा जास्त बैलगाडे सहभागी झाले होते तसेच शर्यत पाहण्यासाठी सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त बैलगाडाप्रेमींची उपस्थिती होती. याञा कमिटीने या स्पर्धेचे उत्तम नियोजन करुन ही स्पर्धा यशस्वी पार पाडली.