शिवेंद्रसिंहराजेंच्या विजयाने जावळी तालुक्यात मोठा जल्लोष
गुलाबाची उधळण-फटाक्यांच्या आतिषबाजीत तालुका गेला.गुलाबी रंगाने न्हाऊन
गुलाबी रंगाने न्हाऊ
मेढा / दत्तात्रय पवार
विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रात एक नंबरचे मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळत गेल्याने कार्यकर्त्यांच्यात उत्साह व जल्लोषाचे वातावरण होते. तर निकालानंतर तब्बल एक लाख ४२ हजार १२४ मतांनी विजय घोषित होताच फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण झाल्याने संपूर्ण जावळी तालुका गुलाबी रंगाने न्हाऊन निघाला होता.
लोकसभा निवडणुकीत भूमिपुत्र म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांना जावळीकरांनी मताधिक्य दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्र अमित कदम यांना डावलून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वावर जावळीतील जनतेने विश्वास ठेवून त्यांना जवळपास सुमारे ३५ हजारांचे प्रचंड असे मताधिक्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हे मताधिक्य मिळवण्यासाठी गेली १४ दिवस तालुक्यातील नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभबाबा शिंदे,बाजारसमिती चेअरमन जयदीप शिंदे, यांच्यासह मातब्बर मंडळी प्रयत्न करीत होते.
कोणतीही निवडणूक असो जावली तालुक्यातील निवडणुकीची सूत्रे ही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याच हातात राहिली आहेत. लोकसभेमध्ये झालेले मतांचे विभाजन विधानसभेत होऊ नये यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मताधिक्य मिळवण्यात यश मिळवले आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजेंना कुडाळ गटातून ११९७१ ,म्हसवे गटातून १०९७२,तर कुसुंबी जिल्हा परिषद गटातून ११७८८ मतांची आघाडी मिळाली आहे.तालुक्यातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मताधिक्याचा आत्मविश्वास होताच, त्यामुळे निकालाच्या आधी दोन दिवस कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर देखील चौकाचौकात लावले होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये केलेली विकास कामे, युवा कार्यकर्त्यांची जोडलेले मैत्रीचे नाते, ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना दिलेले आदराचे स्थान यामुळे बाबाराजेंच्या विषयी आबालवृद्धांमध्ये मध्ये अतूट असे नाते निर्माण झाले होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यावा असा प्रश्नच माविकास आघाडीच्या नेत्यांना पडला होता. समोर पराभव दिसत असल्याने सातारा विधानसभा मतदारसंघाची हक्काची असणारी जागा शरद पवार गटाने शिवसेनेला देऊ केली.राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गट नंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या अमित कदम यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले. या सर्व झालेल्या नाट्यमय घडामोडी पाहता अमित कदम यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला जाणीवपूर्वक उमेदवारी देऊन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विजयाचा मार्ग अधिकच खुला करून देण्यात आला.
जावळी तालुक्याचा विचार करता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जास्तीत-जास्त मताधिक्य देण्यासाठी नेत्यांच्यात व कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ लागलेली पाहायला मिळाली. ही निवडणूक कार्यकर्त्यांनीच आपल्या हातात घेतली होती. गट-गण व प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते घरोघरी जाऊन आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा प्रचार करत होते.
चौकट कुडाळ जिल्हा परिषद गटात सौरभ शिंदे यांचा करिष्मा
कुडाळ जिल्हा परिषद गटात कारखाना गटाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे .आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे झालेल्या सभेत सौरभ बाबा शिंदे यांनी जावळी तालुक्यात मतांची आघाडी देण्यात कुडाळ गट यावेळी पुढे राहील असा शब्द दिला होता. तो शब्द या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी खरा केला असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण कुडाळ गटाची मोर्चेबांधणी सौरभ शिंदे यांनी करीत शिवेंद्रसिंहराजेंच्या मताधिक्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्यासोबत बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे,माजी सभापती राजेंद्र शिंदे, सोसायटीची चेअरमन मालोजीराव शिंदे, जितेंद्र शिंदे, समीर अत्तार, प्रवीण देशमाने, मच्छिंद्र मुळीक आदींनी महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवेंद्रसिंहराजेंना कुडाळ गटातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न केले. माजी आमदार लालसिंगराव शिंदे व प्रतापगड कारखान्याचे माजी चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखाना , लालसिंगराव बापूराव शिंदे पतसंस्था,तालुका खरेदी विक्री संघ इत्यादी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे सौरभ शिंदे यांच्याकडे आहे. या संस्थांचे संचालक मंडळ व कर्मचारी, कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ सौरभ शिंदे यांच्या मागे आहे. त्यामुळेच कुडाळ गटातून मताधिक्य देण्यात सौरभ शिंदेंना खऱ्या अर्थाने यश आले.
चौकट म्हसवे कुसुंबी गटातूनही मताधिक्य
म्हसवे, कुसुंबी गटातून देखील कार्यकर्त्यांनी संपूर्ण दिवस-रात्र काम केलेले पाहायला मिळाले. म्हसवे गटातून जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, माजी सभापती अरुणा शिर्के, माजी उपसभापती हणमंत पार्टे, दत्ता गावडे, रविंद्र परामणे, संदीप परामणे, नितीन गावडे, नितीन मानकुमरे, दत्ता भालेघरे, प्रमोद शिंदे, यांनी या निवडणुकीत मताधिक्य मिळविण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती.तर कुसुंबी गटातून जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे व त्यांचे कार्यकर्ते मेढा शहरातून पांडुरंग जवळ,सागर धनावडे,नाना जांभळे, दत्ता पवार मेढेकर,विकास देशपांडे, विठ्ठल देशपांडे, तुकाराम धनवडे, तसेच महिला अध्यक्ष गीताताई लोखंडे यांनी विशेष प्रयत्न केले होते.