
म्हसवड… प्रतिनिधी
समाजात चांगली व्यक्ती होण्यासाठी संघर्ष हाच यशस्वी जीवनाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथे इयत्ता 12 वी विद्यार्थी शुभचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून देवापुरचे सरपंच व संस्था संचालक तात्यासाहेब औताडे, म्हसवड पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश कांबळे, संस्था सचिव सुलोचना बाबर,प्राचार्य विठ्ठल लवटे व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले जीवनाच्या शर्यतीत दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. चांगल्या गोष्टी घडत नसतात विद्यार्थ्यांनो तुम्हाला त्या घडवाव्या लागतील. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनही उसने मिळत नाही ते निर्माण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करण्याचे आवाहन प्रा. बाबर यांनी केले.
यावेळी बोलताना संस्था सचिव सुलोचना बाबर म्हणाल्या जीवनात नेहमी सकारात्मक राहून प्रयत्न करा. तुम्ही कोणते क्षेत्रात जा मात्र आई वडील व गुरुजींना कधीही विसरू नका. आम्ही कसे घडलो याबाबत पत्रकार महेश कांबळे व सरपंच तात्यासाहेब औताडे यांनी आपली माहिती कथन केली व इयत्ता बारावीचे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी दीपक काटे यांनी तर विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा शिर्के, राजनंदनी घोगरे, व मुद्रा जाधव यांनी अत्यंत भावनिक मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थितताना आपले अश्रू आवरता आले नाहीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कुंटे व अनुष्का तुपे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पल्लवी देशमुख मॅम यांनी व्यक्त केले.
