शिवचरीत्र केवळ अभ्यासाचा विषय नसून आचरणाचा आहे-देशमुख
पंढरपूर अर्बन बँकेच्या व्याख्यानमालेस प्रारंभ
पंढरपूर (वार्ताहर)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे केवळ ऐकण्याचा, अभ्यासाचा किंवा अभिमानाचा विषय नसून आजच्या युवकांनी याचे आचरण करण्याचा विषय आहे. महाराजांच्या एक एक घटना पाहिल्या तर यामधून याकाळात देखील जगण्याचा मंत्र मिळतो असे प्रतिपादन रायगड येथील प्रसिध्द शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले.
येथील दि पंढरपूर अर्बन को.ऑप.बँकेच्या वतीने आयोजित देशभक्त कै.बाबुराव जोशी व्याख्यानमालेस प्रारंभ झाला असून याच्या पहिल्या दिवशी देशमुख हे बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन सौ.सीमाताई प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तसेच बँकेचे अध्यक्ष सतीशजी मुळे, उपाध्यक्षा माधुरीताई जोशी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.प्रशांत देशमुख यांनी आपल्या अतिशय ओघवत्या व उत्स्फुर्त शैलीमध्ये उठ युवका जागा हो शिवचरित्राचा तू धागा हो या विषयावर जवळपास दीड तास उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
यावेळी बोलताना देशमुख यांनी, छत्रपती शिवाजी महाराज हा आपला स्वाभिमान असून मराठी मातीचे महान सुपूत्र आहेत. महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग अतिशय विलक्षण असून यामधून मोठा संदेश मिळतो. जवळपास चारशे वर्षा नंतर देखील महाराजांनी दिलेली शिकवण, त्यांच्या आयुष्यात आलेले विविध प्रसंग पाहिल्यावर ते ज्या प्रमाणे वागले ते पाहून आजच्या काळात देखील कसे जगावे याची शिकवण मिळते असे प्रतिपादन केले. यासाठी देशमुख यांनी काही उदाहरण दिली. आजची पिढी लगेच हताश होते, टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. मात्र महाराजांनी मोठ्या कष्टाने राज्य मिळविले. मात्र मिर्झाराजे जयसिंग यांच्या बरोबर झालेल्या तहात त्यांना आपले किल्ले व अनेक गोष्टींचा त्याग केला. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही, औरंगजेबाच्या कैद म्हणजे मृत्यू परंतु यावरही हुशारीने मात करून तेथून निसटले असे प्रसंग पाहिल्यावर संकटाला पाठ न दाखविता त्यावर मात करणे शिकवते. शत्रुच्या स्त्रीवर हात टाकणार्या आपल्या सरदाराला व पत्नीच्या भावाला देखील भर सभेत शिक्षा करून त्यांनी कायदा सर्वांना समान असल्याचा संदेश दिला. सुरते मध्ये विधवा स्त्रीच्या घराचे संरक्षण केले कारण तीचा पती वारला होताच परंतु तो दानधर्म करणार होता. यावरून चांगल्या कर्मावर त्यांचा विश्वास होता. सर्व जातीला बरोबर घेणारा, त्यांच्यातील गुणांना वाव देणारा हा राजा सर्वोत्तम नेता होता असे सांगून देशमुख यांनी केवळ घोषणाबाजी करून महाराज समजणार नाहीत यासाठी त्यांच्या शिकवणुकीचे आचरण करा असा सल्ला प्रशांत देशमुख यांनी दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संचालक हरिष ताठे यांनी, सूत्रसंचलन शांताराम कुलकर्णी यांनी तर आभार डॉ.संगिता पाटील यांनी मानले.
यावेळी पांडुरंग कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, बाजार समितीचे माजी सभापती दाजी भुसनर, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांतभैय्या देशमुख यांच्यासह पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक पांडुरंग घंटी, विनायक हरिदास, अमित मांगले, गणेश शिंगण, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने, तज्ज्ञ संचालक प्रभुलिंग भिंगे, उदय उत्पात, सोमनाथ होरणे आदी उपस्थित होते.
