तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोकून द्यावे- मदन पाटील

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. १८ (प्रतिनिधी) : देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी ग्रामसफाई, पाण्याची बचत, पर्यावरणाचे संवर्धन, निती मूल्याचे शिक्षण, जातीय सलोखा, आरोग्य संवर्धन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही विशेष शिबिरे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे, तर मानसिक, सामाजिक, भावनिक विकास करून तरुणांना चांगले नागरिक बनण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात. राष्ट्र अभिमान जोपासण्यासाठी तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झुकून द्यावे, असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांनी केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी शनिवारी (ता. १८) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राठोड होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, माजी उपसभापती गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, योगेश राठोड, डॉ. सतिश शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य रमेश जाधव, उपमुख्याध्यापक उल्हास घुरेघुरे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बापूराव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे भूमिपूजन झाडाला आळे व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना मदन पाटील म्हणाले की, सध्या तरुणांसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानावर मात करण्याकरिता या परिसरातील तरुणांनी आरोग्याची काळजी घेणे, वाढती व्यसनाधीनता आणि मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणे गरजेचे आहे. युवकांनी तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल साक्षर बनणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले. डॉ. सतिश शेळके, योगेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. शिला स्वामी, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. विलास खडके, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, विद्यार्थी प्रतिनिधी धीरज मुदकन्ना, विद्यार्थिनी प्रतिनिधी मनिषा पुराणे आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. अशोक बावगे यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.               

    फोटो ओळ : नाईक नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराप्रसंगी मदन पाटील बोलताना बापूराव पाटील, माणिक राठोड, गोविंद पाटील, व्यंकटराव जाधव, योगेश राठोड, अशोक सपाटे व अन्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!