स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्टाची गरज …अश्विनी शेंडग
म्हसवड… प्रतिनिधी
तुम्ही तुमच्या जीवनात पहात असणारी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड कष्टाची गरज असल्याचे प्रतिपादन माण खटावच्या उपवि भागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांनी म्हसवड येथे केले.
म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलामध्ये निर्भया पथकाच्या माध्यमातून विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते . तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्यासह संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर , प्राचार्य विठ्ठल लवटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अश्विनी शेडगे म्हणाल्या विद्यार्थी मित्रांनो तुमची पिढी खूप नशीबवान आहे .तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही देऊ केलेले आहे .वेळेचा व उपलब्ध साधन सुविधांचा लाभ घ्या .तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा आपण चांगल्या व उच्च स्थानी असले पाहिजे. जबाबदारीची जाणीव ठेवा , जिद्द व चिकाटी ठेवा , नेहमी सकारात्मक रहा , प्रगतीची दृष्टी व शोधक वृत्ती जोपासा .अडचण व परिस्थितीवर मात करून यशाला गवसनी घाला .आई वडील व गुरुजनाची जाण ठेवा. चांगले वाईट याचा निवाडा करा. ज्युनिअर कॉलेजचा वयोगट हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. क्रोध व तात्पुरता मोह बाजूला ठेवा . टी व्ही ,मोबाईल शक्यतो टाळा, किंवा त्याचा जुजबी वापर करा. अवांतर वाचनासह वैज्ञानिक गुण जोपासण्याचे आवाहन अश्विनी शेडगे यांनी केले . शिक्षणातील व सुशिक्षितांची बेरोजगारी हा भयानक प्रश्न असल्याचे सांगून कौशल्य युक्त शिक्षण गरजेचे असल्याचे स्पष्ट केले .या निमित्ताने शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तरुण वयात होणाऱ्या चुका , भेडसावणारे प्रश्न , निर्माण होणारे संकट यासाठी तात्पुरत्या कृत्रिम आकर्षणापासून दूर राहण्याचे आवाहन शेंडगे यांनी केले. रोड रोमिओ चा बंदोबस्त, महाविद्यालयीन युवतीचे स्वसंरक्षण याबरोबरच निर्भया योजना व संलग्न कायद्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. नावाप्रमाणेच क्रांतिवीर शैक्षणिक संकुल हे क्रांतिकारी शैक्षणिक संकुल असून या ठिकाणी उपक्रमशीलतेचा वसा विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांनी जपल्याचे स्पष्ट होत असल्याने अश्विनी शेंडगे यांनी बाबर दांपत्याच्या कार्याचा गौरव केला .
या निमित्ताने संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या कार्याचा गौरव केला .प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी प्रास्ताविक करून म्हसवड पोलीस स्टेशन तर्फे राबवण्यात येणाऱ्या उपयुक्त निर्भया पथक कार्या बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी निर्भया पथकातील सचिन जगताप, ज्ञानेश्वर टिंगरे ,सागर पोळ ,रवी गुरव, राजश्री खाडे हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या निमित्ताने विद्यार्थी व पोलीस अधिकारी यांच्यात महत्वपूर्ण संवाद व प्रश्न उत्तरे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका वृषाली सावंत तर उपस्थिताचे आभार शिक्षिका पल्लवी देशमुख यानी व्यक्त केले.