माणदेशी महिला सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र यापुढे संपूर्ण महाराष्ट्रभर’ -श्रीमती चेतना सिन्हा यांची माहिती
…म्हसवड: माणदेशी महिला सहकारी बँकेला एक नवा अध्याय सुरू करण्याची संधी मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि महाराष्ट्र राज्य सहकार विभागाने माणदेशी बँकेला राज्यभर (कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र) बँकिंग व्यवसाय करण्यास अधिकृत परवानगी दिली आहे.
1997 साली स्थापना झालेली माणदेशी महिला सहकारी बँक ग्रामीण भागातील महिलांसाठी वित्तीय साक्षरता, बचत, आणि उद्योजकतेसाठी बळकट आधारस्तंभ म्हणून ओळखली जाते. सध्या बँकेच्या 8 शाखा कार्यरत असून बँकेचे सध्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, रायगड , कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य विस्तार करण्याची परवानगी मिळाल्याने बँकेला आपले बँकेचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढवता येणार आहे.
माणदेशी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखाताई कुलकर्णी यांनी सांगितले की, “ही परवानगी म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीची आमची वचनबद्धता आणखी मजबूत करणारा टप्पा आहे. या विस्ताराच्या माध्यमातून आम्ही महिलांना अधिकाधिक आर्थिक सुविधा, कर्ज योजना, आणि डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ देणार आहोत.”

चेतना सिन्हा
अध्यक्षा माणदेशी महिला सहकारी बँक लि.म्हसवड
“माणदेशी बँक ही केवळ बँक नाही, तर ग्रामीण महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचे साधन आहे. महाराष्ट्रभर सेवा विस्तार करण्याची परवानगी मिळणे हा आमच्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी संधी यामुळे निर्माण झाली आहे. या माध्यमातून आम्ही महिलांना फक्त वित्तीय मदतच नव्हे, तर त्यांचे स्वप्ने साकार करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ देऊ. बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र करण्यास परवानगी दिल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि महाराष्ट्र राज्य सहकार विभागाचे मनापासून धन्यवाद ”
बँकेच्या या पुढील प्रवासामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचतील तसेच महिला उद्योजकतेला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

