मुरुम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी) :
घरातील आईवडिलांना जो सन्मान मिळवून देतो, तोच यशस्वी होतो. आई-वडीलांचे कष्ट आणि त्याग याचा विसर जीवनात पडता कामा नये. आई-वडील एकदा निघून गेले तर जगात कोणीही आपले उरत नाही, जोवर ते आहेत तोपर्यत त्यांना आनंदी ठेवा. एक समाधानी कुटूंब म्हणून जगायला हवे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या आदर्शावर चालायला हवे. युवक-युवतीनी आपल्या आईवडीलांची मान खाली जाईल, असे काम करू नये, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. केसरजवळगा, ता. उमरगा येथील मातोश्री गंगाबाई शिवमुर्ती पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त डॉ. रोहित पाटील युवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित आई-बाप समजून घेताना या विषयावर डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान मंगळवारी (ता. ३) रोजी संपन्न झाले. यावेळी डॉ. रोहित पाटील युथ फाउंडेशने केलेल्या कामाचा आढावा सादर करताना डॉ. रोहित पाटील म्हणाले की, आपल्या आईच्या आठवणीने प्रत्येकाच्या काळजाला हात घातला. जगात सर्व काही मिळू शकते पण आईची माया कधीच मिळणार नाही. आपल्या आईबापांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्या जीवाचे रान करा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. व्याख्याना नंतर मुली आपल्या वडिलांच्या गळ्याला पडून अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होत्या. डॉ. रोहित पाटील युवा फाउंडेशने जिल्हा परिषद शाळेस शैक्षणिक, क्रीडा साहित्य, टी. व्ही. संच, वृक्षारोपण, तालुकास्तरीय वकतृत्व स्पर्धा, स्मशानभूमी परिसर स्वच्छता, गावातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यास सहकार्य गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान, देशभक्तीपर गीत अशा विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. भविष्यात शाळा, आरोग्य व गावाच्या भौतिक सुविधेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा मानस यावेळी फाउंडेशनकडून बोलून दाखविण्यात आला. यूथ फाउंडेशनच्या वतीने गावात राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक-सामाजिक उपक्रमास सहकार्य म्हणून मयूर राऊत यांनी अकरा हजार, घोडके सूर्यकांत यांनी एकवीस हजार तर कोथळीचे माजी सरपंच आप्पासाहेब पाटील यांनी एकवीस हजार रूपयांचा चेक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कलकेरी व शरण कणमुसे यांना सुपूर्द केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रोहित पाटील युथ फाउंडेशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन बालाजी भोसले तर आभार युसूफ गवंडी यांनी मानले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या भव्य प्रागंणावर आयोजित कार्यक्रमात महिला, पुरुष व विद्यार्थ्यांसह मुरूम, आलूर, वरनाळवाडी व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी-पालक मोठया संख्येने उपस्थिती होते. फोटो ओळ : केसरजवळगा, ता. उमरगा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. वसंत हंकारे बोलताना नागरिक
