जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची दहिवडी नं.१ शाळेस आकस्मिक भेट

Spread the love


गोंदवले.- सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकतीच माण तालुक्यातील दहिवडी नं.१ जिल्हा परिषद शाळेस अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शालेय उपक्रम व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्याने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना नवचैतन्य प्राप्त झालेजिल्हाधिकाऱ्यांचे शाळेत आगमन होताच विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम खेळत जंगी स्वागत केले. इयत्ता पाचवीतील साहिल दडस या विद्यार्थ्याने गुलाबपुष्प देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत शालेय परिसराची माहिती देत आपली इंग्रजीतील तयारी सिद्ध केली. यामुळे जिल्हाधिकारी पाटील यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले.

गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमाचे उद्घाटन
यावेळी जिल्हा परिषदेच्या ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या विशेष उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक गुढी उभारून आणि श्रीफळ वाढवून हा कार्यक्रम पार पडला. शिक्षकांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच, इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे पालकांसह फेटा बांधून, गुलाबपुष्प, वही आणि पेन देऊन औक्षण करत स्वागत करण्यात आले.

जिल्हाधिकारी पाटील यांनी शाळेतील आय.सी.टी (ICT) लॅब व विद्यार्थ्यांचे संगणक ज्ञान तपासले. त्यांनी तीन महिन्यांत शाळेत झालेल्या सकारात्मक बदलांची तसेच ‘व्हिलेज गो टू स्कूल’ या उपक्रमाच्या यशस्वितेची माहिती इंटरऍक्टिव्ह बोर्डवर पाहिली. विशेषतः, विविध माध्यमातून मिळालेल्या आर्थिक आणि वस्तूरूपातील लोकसहभागाबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक योगदानाची माहिती घेतली. विशेष म्हणजे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी याच शाळेत घेतलेल्या शिक्षणाची दस्तऐवजांतील नोंद त्यांनी उत्सुकतेने पाहिली. या ऐतिहासिक नोंदींचे रजिस्टर त्यांनी पाहिले आणि त्याचा फोटोही काढला.

जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा शाहिरी पोवाडा जिल्हाधिकाऱ्यांनी आवडीने ऐकला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने प्रभावित होऊन, जिल्हाधिकारी पाटील यांनी स्वतः ५०० रुपयांचे बक्षीस देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमास प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड, मुख्याध्यापिका सुनिता यादव, शिक्षिका केशर माने, रश्मी फासे, मनिषा बोराटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणाच्या लिखित नोंदींचा दस्तऐवज जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून दिला. हा अभिमानास्पद क्षण शाळेच्या शैक्षणिक वारशाचा गौरव करणारा ठरला.जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणा मिळाली असून, शाळेच्या प्रगतीसाठी अधिक ऊर्जा प्राप्त झाली.
छाया – जिल्हाधिकारी यांचे समवेत शिक्षकवृंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!