मंत्री पदासाठी अमित शाह यांनी मागवले भाजप आमदारांचे रिपोर्टकार्ड; अटी पूर्ण करणारे होणार मंत्री?

Spread the love

कोल्हापूर , सातारा वृत्तसेवा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला आहे. त्यानंतर दहा दिवस होत आले तरी महायुतीचे सरकार अजून अस्तित्वात आले नाही. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी ठरला आहे.

परंतु मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर झाले नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये खाते वाटप आणि मंत्रीपदाची चर्चा सुरु आहे. कोणत्या पक्षाला कोणती खाती जाणार? तसेच मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार? याबाबत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीत चर्चा होत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिपदासाठी निकष जाहीर केले आहे. या निकषांची पुर्तता करणाऱ्यांना मंत्रीपद मिळणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवले आहे. संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केले होते का? हे पाहिले जाणार आहे.

मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केले? संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता. महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती? केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला? संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का? या मुद्यांचे रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावले आहे. आज महायुतीचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. भाजपमधील मंत्रीपदाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असणार आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु मंत्रिपदे देताना काय निकष असावे, त्यासंदर्भातील अटी केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहेत.

त्या मेरीटवर मंत्रीपदे बहाल केली जाणार आहे. त्यात त्या आमदाराची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कशी होती? त्याच्या मतदार संघ आणि इतर जागांवर त्याने उमेदवार निवडून येण्यासाठी काय प्रयत्न केले ते पाहिले जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्या व्यक्तीची कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.

त्याची मंत्रिमंडळाच्या बैठकांची उपस्थिती पाहिली जाणार आहे. तसेच मंत्रिमंडळात असणाऱ्या आमदाराबाबत कोणताही वादविवाद नको आहे, अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहे. मंत्री असणाऱ्याने सर्वांना समावून घेण्याची जबाबदारी पार पाडावी तसेच पालकमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता त्याच्यात हवी, असे केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे. यावर मंत्रीपदाचे खाते वाटप जाहीर होणार आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त युवा आमदारांना संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार आहे. त्यात तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेणार आहे. या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेचे दहा ते बारा, राष्ट्रवादीचे आठ ते नऊ आणि भाजपकडून वीस जणांना मंत्री केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!