दहिवडी, (वार्ताहर ) विजय पाठक –
12 सप्टेंबर 2025 :
माण तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाला नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा माणदेशी जलनायक जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नांना यश येत किल्ले वारूगड येथील श्री भैरवनाथ देवस्थान, श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान (मलवडी), भोजलींग देवस्थान व जांभुळणी येथील देवस्थान यांना शासनाने “ब” वर्ग दर्जा प्रदान केला आहे.
भक्तांच्या भावनांना बळ
शतकानुशतकांपासून गावागावातील भाविक या देवस्थानांना नतमस्तक होत आले आहेत. यात्रेच्या काळात लाखो भक्तांची पावले या पवित्र स्थळांकडे वळतात. मात्र, योग्य सुविधा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. शासनाच्या या निर्णयामुळे आता यात्रेकरूंना निवास, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते व इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे भक्तांच्या श्रद्धेला अधिष्ठान तर मिळेलच, पण त्यांच्या भावनांनाही नवे पंख मिळतील.
स्थानिकांना रोजगाराची संधी
देवस्थानांचा विकास झाला तर यात्रांच्या निमित्ताने स्थानिक अर्थव्यवस्था फुलणार आहे. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, हातगाडी, स्मृतिचिन्ह विक्रेते अशा अनेक व्यवसायांना रोजगार व उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. गावोगावच्या महिलांना स्वयं-सहायता गटांमार्फत आर्थिक बळकटी मिळेल.
ऐतिहासिक निर्णय
महाराष्ट्र ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय क्र. तीर्थवि-2011/प्र.क्र.651/यो-7 दि.16-11-2012 नुसार राज्य निकष समितीने हा निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना अंतर्गत या देवस्थानांचा समावेश होणे हे माण तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरले आहे.
जनतेत आनंदाचा माहोल

या निर्णयामुळे माण तालुक्याच्या जनतेमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. देवस्थान परिसरात वाजत-गाजत स्वागत सोहळे होत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी “हा निर्णय म्हणजे आमच्या श्रद्धास्थानांचा सन्मान आहे” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. सर्व स्तरातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्याचे कौतुक होत असून त्यांचे सत्कार व अभिनंदनाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत.
उपसंपादक : विजय पाठक
इंडिया 9 न्यूज.
–