
पंढरपूर वार्ताहर
आज आषाढी एकादशी वारीच्या पूर्व नियोजनाबाबत पंढरपूर येथील मंदिर समितीची श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस आमदार समाधान आवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री सेवागिरी महाराज देवस्थान पुसेगाव मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज,जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे,प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, वास्तु विशारद श्रीमती तेजस्विनी आफळे, लेखाधिकारी मुकेश अनेचा, किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर, तसेच ऑनलाईनद्वारे मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ६ जुलै २०२५ रोजी असून, आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने आवश्यक सुविधा पुरविण्याबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन व्हावे, यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही .भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजा कालावधीत श्रींचे मुखदर्शन सुरू ठेवावे अशा सूचना या बैठकीत दिल्या.
शासकीय महापूजेच्या वेळी मुखदर्शन व्यवस्था सुरू ठेवावी तसेच शासकीय महापूजा संपताच तात्काळ रांगेतील भाविकांची दर्शन व्यवस्था पूर्ववत करावी. शासकीय महापुजेवेळी मंदिरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन महापूजेला उपस्थितांची संख्या मर्यादित राहील याची दक्षता घेवून, शासकीय महापूजा विधीवत व परंपरेने पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. भाविकांना जलद दर्शन व्हावे यासाठी व्हिआयपी दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आणावेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे त्या कामामुळे विद्युत वाहक केबल अस्ताव्यस्त झाल्या असून त्या केबल २४जून पर्यंत पूर्ववत कराव्यात तसेच यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेले काम थांबवून सदर ठिकाणची स्वच्छता करावी. एकादशी वारी कालावधीत नामदेव पायरी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. दर्शन रांगेतील स्काय व तात्पुरते उड्डाण पूलांची पाहणी करून ते तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का याची तपासणी करावी तसेच मंदिर व मंदिर परिसरातील इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट करण्यात यावे अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.