महिमानगडचे महसुली दस्ताऐवज तत्काळ उपलब्ध करा.पुरातत्व विभागाची माणच्या तहसीलदारांकडे मागणी

Spread the love

गोंदवले –
महिमानगड ता. माण (दहिवडी) जि. सातारा येथील शिवकालीन महिमानगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी महसुली दस्तऐवज उपलब्ध न झाल्याने याबाबतचा प्रस्ताव पाठवता आला नाही. किल्ल्याचे महसुली दस्तऐवज ताबडतोब सादर करावेत, अशा मागणीचे पत्र पुरातत्त्व विभाग (पुणे) चे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी माणच्या तहसीलदारांना पुन्हा दिले आहे.
अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांच्या मागणीनुसार पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे व पुरातत्त्व विभागाच्या समन्वयक प्रियाका चव्हाण-इथापे यांनी किल्ल्यास यापूर्वीच भेट दिली होती.


अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांनी सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांची भेट घेऊन शिवकालीन महिमानगड किल्ल्याचे संवर्धन व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मागणी व पाठपुरावा केला होता. शिवकालीन मुख्य किल्ल्यापैकी एक असलेल्या व राज्य शासनाकडून बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या महिमानगड किल्ल्यासाठी राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी अमोल एकळ यांनी केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा नियोजन समितीनेही याबाबत पर्यटन संचालनालय पुरातत्व विभागाच्या पुणे येथील सहाय्यक संचालकांच्या निदर्शनास ही बाब आणली होती.
या पार्श्वभूमीवर पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे व पुरातत्त्व विभागाच्या समन्वयक प्रियांका चव्हाण-इथापे यांनी महिमानगड किल्ल्याची पाहणी केली. काट्याकुट्यातून जाणारे रस्ते, पाण्याची टाकी, मारुती मंदिर, तबेला यांची बारकाईने पाहणी केली. महिमानगडचे उपसरपंच विजय चव्हाण, नारायण जाडकर यांनी पाहणी करताना काही मुद्दे उपस्थित केले होते. एकूणच महिमानगड किल्ल्याचे संवर्धन आणि पर्यटन केंद्र होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.


दरम्यान, पुरातत्त्व विभागाने माणच्या तहसीलदारांकडे किल्ला राज्य स्मारक होण्यासाठी महसुली दस्तऐवजांची मागणी पुन्हा केली आहे. महिमानगड किल्ल्याचे मालकी दर्शवणारे सातबारा उतारे, किल्ल्याचा प्रमाणबद्ध नकाशा, किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ, किल्ल्याच्या चतु:सीमेचा नकाशा या महसुली दस्तऐवजांची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. पुन्हा एकदा महिमानगड किल्ला राज्य स्मारक व पर्यटन केंद्र होण्यासाठी प्रशासनातर्फे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.


…….फोटो ओळी….
महिमानगड ता. माण (दहिवडी) येथील शिवकालीन महिमानगड किल्ल्याची पाहणी करताना पुरातत्व विभागाचे अधिकारी व अमोल एकळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!