औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे
खटाव तालुक्यातील औंध येथील कु. सोनाली गजानन कुंभार हिने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठे यश संपादन केले आहे. तिची नेमणूक धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे तलाठी म्हणून झाली आहे.
सोनालीचे वडील गजानन कुंभार हे गवंडी काम करतात तर आई शोभा शेती व्यवसायात काम करतात ग्रामीण व सामान्य कुटुंबातील मुलगी म्हणून त्यांनी कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर यश मिळवले.
२०२१ साली औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयातून बी.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. २०२३ मध्ये त्यांनी तब्बल १२ परीक्षा दिल्या, त्यापैकी चार परीक्षेत ‘वेटिंग लिस्ट’पर्यंत पोहोचल्या. त्यानंतर नगर रचना विभाग, पालघर येथे सेवा करण्याची संधी मिळाली आणि तेथे एक वर्ष सेवा बजावल्यानंतर आता धुळे जिल्ह्यात तलाठी म्हणून निवड झाली आहे.
त्यांच्या या यशामुळे औंध व परिसरात आनंदाचे वातावरण असून सोनाली यांनी तरुणांसाठी परिश्रम व चिकाटीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.