
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
माण मतदारसंघात महाविकास आघाडीचा अनपेक्षित पराभव हा धक्कादायक निकाल असला तरी त्याची जबाबदारी आम्ही कार्यकर्ते स्वीकारत आहोत असे मत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते श्री. जयवंत खराडे यांनी व्यक्त केले आहे.
ही निवडणूक सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारी आहे. लाडक्या बहिणींनी मतदारसंघातील प्रश्नापेक्षा मानधनाला जास्त महत्त्व दिले. मतदारांना अचानक धनलक्ष्मी प्रसन्न झाली तर सद्सद्विवेकबुद्धी अकार्यक्षम होते याचा प्रत्यय आला. यापुढे राजकीय पदे विकत घेता येतात हा संदेश दृढ होणार असे दिसते. यापुढे कितीही राजकीय पात्रता असली तरी आर. आर. पाटील यांच्यासारखा एखादा गरीबाचा मुलगा मंत्री होईल ही आशा मावळली आहे. त्यामुळे धनलक्ष्मीचा अभाव असल्यामुळे आम्ही सामान्य कार्यकर्ते कोणतीही निवडणूक लढवणार नाही मात्र सत्ताधाऱ्यांना जनतेची कामे करायला भाग पाडण्यासाठी विरोधकांची भूमिका पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. औंध भागासाठी पाणी योजना, इतर वंचित गावांना पाणी, शिक्षण, आरोग्य, शेतमालासाठी कोल्ड स्टोरेज इत्यादी जनतेच्या न्याय मागण्यासाठी आवाज उठवला जाईल. असेही मत श्री. खराडे यांनी व्यक्त केले आहे.