म्हसवड वार्ताहर
अहिंसा पतसंस्थेत लॉकर पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्री नितिनभाई दोशी होते. मीरा भाईंदर येथील भाजपा नेते श्री शंकरभाई विरकर यांचे हस्ते फित कापून लॉकर पूजन करण्यात आले.
यावेळी गोल्डनमॅन शंकरभाई विरकर, चेअरमन नितिन दोशी, सिद्धनाथ पतसंस्थेचे माजी संचालक नारायण माने, अशोक नामदे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोल्डन मॅन शंकरभाई विरकर म्हणाले कि, अहिंसा पतसंस्थेने नेहमी सभासदांच्या हिताचे उपक्रम सुरु असतात. संस्थेचे उत्पन्न वाढले तर संस्था आर्थिकदृष्टया बळकट होते व कर्मचाऱ्यांचा हि आर्थिक विकास होतो यासाठी कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजामध्ये प्रामाणिकपणे काम केले पाहिजे.
अहिंसा पतसंस्थेच्या चौफेर प्रगतीसाठी श्री विरकर यांनी शुभेच्छा दिल्या व सभासदांनी लॉकर सुविधेचा चा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी म्हणाले आज दुग्धशर्करा योग आहे लॉकर ची सुविधा सोने व इतर चीज वस्तू ठेवण्यासाठी असते व लॉकर चे पूजन ज्यांची ओळख गोल्डन मॅन अशी आहे ते मीरा भाईंदर चे भाजपा नेते शंकरभाई विरकर यांचे हस्ते होत आहे. याचा आम्हा सर्वाना आनंद आहे.
बनगरवाडी सारख्या ग्रामीण भागातून जाऊन मीरा भाईंदर येथे सामाजिक काम करत राजकीय क्षेत्रात भरारी शंकरभाईंनी घेतली असून आमची नेहमीच एकमेकांना साथ असते. त्यांच्या अंगावरच नुसते सोने नाहीतर त्यांचे मनही सोन्यासारखे आहे.
त्यांचे कार्य यापुढेही सुवर्ण अक्षरांत लिहण्यासारखे व्हावे अशी भावना यावेळी व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक दिपक मासाळ, प्रशांत आहेरकर, महेश पतंगे, नीरज व्होरा,अमजद मुजावर, नाना मासाळ व मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री नितिन वाडेकर यांनी केले. तर आभार मनोज शिंदे यांनी मानले.
