पिंपोडे बुद्रुक / प्रतिनिधी/अभिजीत लेभे
करंजखोप, ता. कोरेगाव येथील गावकऱ्यांनी डॉल्बी व बेंजो बंद बाबतची मागणी दि, २६ जानेवारीच्या ग्रामसभेत केली होती. लोकहिताचा विचार करून सरपंचांनी सदर मागणीचा ग्रामसभेचा ठराव करून त्याची अंमलबजावणी आजपासून केली.
करंजखोप ता कोरेगाव येथील गावकऱ्यांनी प्रजाकसत्ता दिनाचे अवचित साधत दि,२६ जानेवारी रोजी डॉल्बी व बेंजो बंदीबाबत एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेत घेतला असून गावातील शांतता, विद्यार्थ्यांचे शिक्षण व वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता करंजखोप ग्रामस्थांनी डॉल्बी व बेंजो वाजवण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.त्यामध्ये डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे गावातील विद्यार्थी, अभ्यास करणारे युवक व वयोवृद्ध नागरिक यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होत असून, गावात अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे गावात डॉल्बी व बेंजो वाजवण्यावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. लोकांच्या मागणीचा विचार करून करंजखोप येथील सरपंच राधिका यशवंत धुमाळ यांनी आज शुक्रवार दि,२५ जुलै २०२५ पासून त्याची अंमलबजावणीस सुरुवात केली. सदर ग्रामसभेच्या ठरावाची प्रत वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अविनाश माने यांच्याकडे देण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट :— उत्सव तसेच लग्न समारंभात प्रामुख्याने डॉल्बीचा वापर करण्यात येतो.डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे बहिरेपणा, लहान मुलांना तसेच वृद्धांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते तरी लोकांनी सण,उत्सव, मिरवणुकी दरम्यान पारंपारिक वाद्याचा वापर करावा. करंजखोप गावाने डॉल्बी व बेंजो बंदी बाबत ग्रामसभेत ठराव घेतला. त्यांचे मी स्वागत करतो तसेच माझ्या कार्यक्षेत्रातील इतर गावांनी सुद्धा पुढाकार घेऊन करंजखोप गावचा आदर्श घ्यावा.
: अविनाश माने प्रभारी वाठार पोलीस स्टेशन.