म्हसवड…प्रतिनिधी
शालेय स्तरावरच भविष्याचे नियोजन करून जीवनात उच्च ध्येय ठेवा असे आवाहन राष्ट्रीय नौदल विभाग अंतर्गत कर्नाटक राज्य नौदल कारवार विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कॅप्टन जयवंत इंदलकर यांनी म्हसवड येथे केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे विद्यार्थ्यांसाठी विविध संरक्षण सेवा विषयक मार्गदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते.

यावेळी बोलताना कॅप्टन जयवंत इंदलकर म्हणाले सध्याची शालेय युवा पिढी खूप नाविन्यपूर्ण, शक्तिमान व आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त आहे. तंत्रज्ञानातील चांगलं आणि वाईट याबाबत या पिढीला मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शालेय शिक्षण स्तर हा भविष्याचा पाया असून याचवेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे.
आधुनिक युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड वाव असून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उच्च ध्येय ठेवण्याचे आवाहन जयवंत इंदलकर यांनी केले.
पुढे बोलताना कॅप्टन इंदलकर म्हणाले अभ्यासाबरोबरच जीवनात खेळालाही महत्त्व द्या. त्यामध्ये नियमितपणा ठेवा. नियमित अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची आवड जोपासा. वाचाल तरच वाचाल याची जाण ठेवा. विद्यार्थ्यांनो तुमच्यापेक्षा मी खूप सामान्य घरातून, गरिबीतून पुढे आलेलो आहे. जिद्द चिकाटी बाळगल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे इंदलकर यांनी स्पष्ट केले.
या निमित्ताने केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन बोर्ड, एन डी ए , सी डी एस , संरक्षण सेवेत महिलांचे स्थान व सद्यस्थिती, असणारा वाव, संरक्षण सेवेचा अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया , भरतीसाठी करावयाचे नियोजन, शारीरिक व मानसिक क्षमता याबाबत इंदलकर यांनी मार्गदर्शन केले. आपल्या संरक्षण सेवेतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण व अविस्मरणीय प्रसंगाची विद्यार्थ्यांना आठवण करून देऊन विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. याद्वारे संरक्षण सेवा हीच देशी सेवा सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील शैक्षणिक संकुल असून विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर दांपत्याच्या शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक समन्वयक अभिजीत सावंत यांनी केले. या निमित्ताने गुणवंत व कर्तव्यदक्ष विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे आभार वाणीश्री सावंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.