मंगळवेढा बस स्थानकाचे काँक्रिटीकरणाचे काम मे महिन्यापूर्वी पूर्ण करा : आमदार समाधान आवताडे

प्रतिनिधी:मंगळवेढा बस स्थानकाला पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. तसेच बसस्थानकाचे अंतर्गत काँक्रिटिकरण काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या. तसेच सदरचे काम पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.शहरी व ग्रामीण जीवनाची जीवनवाहिनी अधिक बळकट करण्यासाठी व बसस्थानक नूतनीकरणासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंगळवेढा बसस्थानकास करोडोचा मुबलक विकासनिधी प्राप्त करून घेतल्याने बसस्थानक आवारातील विविध विकासकामे पूर्णत्वाच्या प्रगती पथावर आली आहेत.आजही समाज व्यवस्थेच्या विशेषतः ग्रामीण भागात वाहतुकीचे प्रभावी साधन म्हणून एसटी कडेच पाहिलं जात असल्यामुळे सामान्यांच्या जिव्हाळ्याची ‘लालपरी’च्या सुविधा आणखी गतिमान होण्यासाठी आपण कायम कटीबद्ध आहोत अशी भूमिका घेऊन बसस्थानक व्यवस्थापकीय प्रशासन आणि अधिकारी व पदाधिकारी यांना आवश्यक सूचना करुन कार्यवाही करण्याचे सूचित केले.यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, विद्या विकास मंडळाचे सचिव ॲड रमेश जोशी, माजी संचालक श्री. लक्ष्मण जगताप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. अजित जगताप, माजी नगरसेवक श्री. कैलास कोळी, श्री. पांडुरंग नकाते, पत्रकार श्री. प्रशांत मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पिंटू मोहिते आदींसह सहकारी तसेच प्रवासी आणि कर्मचारी बांधव उपस्थित होते.