वनविभाग व प्रशासनाची बेपरवाई जोतिबा डोंगरावरील वणव्यात वनसंपदा खाक, १०० ते १५० करवंदाच्या झाडांचा नाश

Spread the love

औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे

औंध ता.१८: औंध येथील जोतिबा डोंगर परिसरात गुरुवारी रात्री आठ वाजता लागलेल्या भीषण वणव्याने संपूर्ण परिसर धगधगून निघाला. या आगीत सुमारे १०० ते १५० करवंदाच्या झाडांसह मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली. सुमारे 50 ते 60 हेक्टर परिसर यामध्ये जळून खाक झाला यामध्ये वनसंपत्ती बरोबरच पशुपक्षी यांची अंडी व यांचे वास्तव्य याला धोका निर्माण झाला आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे, या संकटावेळी वनविभाग आणि प्रशासनाचे घोर दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून आले. यावेळी औंध येथील स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करून रात्री आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु हा वणवा इतका तीव्र होता की बेसुमार वाऱ्याच्या पुढे स्थानिक नागरिक ही हतबल झाले रात्री उशिरापर्यंत हा वणवा असाच सुरू होता

वणवा गुरुवारी रात्री आठ वाजता लागूनही त्याच्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कोणतीही तत्काळ कारवाई करण्यात आली नाही. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आग हॉटेल माउंटन व्ह्यूच्या पाठीमागील भागात पोहोचली होती. त्यावेळी आशिष देशमुख व जायगाव गावातील ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून स्वतः पुढाकार घेत आग विझवण्याचे कार्य केले. ग्रामस्थांनी पाण्याचे ड्रम, फवारणीची साधने वापरून शुक्रवारी दुपारी उन्हात अथक प्रयत्न केले, तेव्हाच आग आटोक्यात आली.

वनविभागाची ही निष्क्रीयता आणि प्रशासनाची उदासीनता थेट वनसंपदेच्या जीवावर उठली आहे. करवंदासारखी औषधी व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची झाडे यामध्ये भस्मसात झाली. हे केवळ निसर्गाचे नुकसान नाही, तर स्थानिक आदिवासी व ग्रामीण जीवनशैलीवरही गडद परिणाम करणारे आहे.

“आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आग विझवली, पण प्रशासन कुठेच दिसले नाही. जर वेळेवर मदत मिळाली असती, तर इतके नुकसान टळले असते,” असे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.

ही घटना वनविभागाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. अशी आगी दरवर्षी लागतात, पण यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. सरकार आणि संबंधित विभागांनी याचा तात्काळ विचार करून जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशी संकटे टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, हीच नागरिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!