क्रांतिवीर नागनाथ अण्णा हे बहुजनाचे दीपस्तंभ …. प्रा. विश्वंभर बाबर

Spread the love


म्हसवड… प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हे खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिवीर नागनाथांना नायकवडी शाळा व क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथे आदरांजली कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी संस्था सचिव सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव, संकुलातील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. विश्वंभर बाबर म्हणाले क्रांती नागनाथ अण्णा हे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बहुजन समाजाचे नेते होते. शेतकरी ,कष्टकरी, शेतमजूर, कामगार, वंचित , दलिता इत्यादींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते आयुष्यभर झिजले. दुष्काळी 13 तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी सुरू केलेली चळवळ आजही त्यांचे पुत्र वैभव काका नायकवडी यशस्वीपणे चालवत आहेत. क्रांतिवीर अण्णा 1942 च्या लढ्यातील क्रांती सेनानी होते. शाहू फुले आंबेडकर यांच्या कृतिशील विचाराचा वारसा अण्णांनी जपला. डाव्या पुरोगामी विचाराचे ते समर्थक होते. राज्यातील आदर्श हुतात्मा सहकारी साखर कारखाना, दूध संस्था व शिक्षण संस्था उभे केल्याने ते सहकारातील महामेरू असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजा विरुद्ध लढा देणाऱ्या क्रांतिकारक नागनाथ अण्णा यांचे जीवन चरित्र विषयक पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावे असे आवाहन बाबर यांनी केले. पाणी चळवळीच्या माध्यमातून क्रांतिवीर अण्णांचा सहवास तसेच म्हसवड येथे त्यांचा वारसा चालवण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल प्रा.बाबर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थी शुभम कोडलकर यांनी अण्णांच्या जीवन कार्याची आपल्या मनोगत मधून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित यांचे आभार नामदे मॅम यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!