
डॉ. विलास वाहणे यांनी दिली भेट
: गोंदवले – महिमानगड ता. माण (दहिवडी) जि. सातारा येथील शिवकालीन महिमानगड
किल्ल्याची बुधवारी (दि.४) पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांच्या मागणीनुसार पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे व पुरातत्त्व विभागाच्या समन्वयक प्रियाका चव्हाण-इथापे यांनी किल्ल्यास भेट दिली.
अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांनी सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांची भेट घेऊन शिवकालीन महिमानगड किल्ल्याचे संवर्धन व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मागणी व पाठपुरावा केला होता. शिवकालीन मुख्य किल्ल्यापैकी एक असलेल्या व राज्य शासनाकडून बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या महिमानगड किल्ल्यासाठी राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी अमोल एकळ यांनी केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा नियोजन समितीनेही याबाबत पर्यटन संचालनालय पुरातत्व विभागाच्या पुणे येथील सहाय्यक संचालकांच्या निदर्शनास ही बाब आणली होती.
पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे व पुरातत्त्व विभागाच्या समन्वयक प्रियांका चव्हाण-इथापे यांनी महिमानगड किल्ल्याची पाहणी केली. काट्याकुट्यातून जाणारे रस्ते, पाण्याची टाकी, मारुती मंदिर, तबेला यांची बारकाईने पाहणी केली. महिमानगडचे उपसरपंच विजय चव्हाण, नारायण जाडकर पाहणी करताना सहभागी झाले. एकूणच महिमानगड किल्ल्याचे संवर्धन आणि पर्यटन केंद्र होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
…….
फोटो ओळी….
महिमानगड ता. माण (दहिवडी) येथील शिवकालीन महिमानगड किल्ल्याची पाहणी करताना पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, समन्वयक प्रियांका चव्हाण- इथापे, अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ व पदाधिकारी.