
म्हसवड वार्ताहर
साडेतीन मुहुर्तापैकी एक समजल्या जाणार्या गुढीपाडव्याच्या सण अवघ्या काही दिवसांवर येवुन ठेपला असल्याने या सणानिमीत्त लागणार्या साखरेचे हार बनवण्याच्या कामाला म्हसवड शहरात चांगलीच गती आली आहे.
म्हसवड शहरात कांबळे बंधु यांचे साखरेचे हार सर्वदुर प्रसिद्ध असुन पाढव्यानिमीत्त लागणार्या या साखरेच्या हारा ला सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातही मोठी मागणी आहे. पांढरे, व रंगीबेरंगी साखरेचे आकर्षक हार बनवण्याची सध्या लगबग सुरु आहे. पाढव्याच्या १ महिना अगोदर हे हार बनवण्यास सुरुवात होते, यासाठी नगर येथील कुशल कारागिर म्हसवड येथे १ महिन्यासाठी मुक्कामी राहुन हार बनवण्याचे काम करीत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा या सणाला फार महत्व असुन या सणानिमीत्त प्रत्येक हिंदु नागरीक हा आपल्या घरावर गुढी उभारत असतो, तर गुढी ही मांगल्याचे प्रतिक मानले जाते या गुढीला साखरेचा हार घालण्याची मोठी परंपरा आहे. गुढीपाडव्यापासुन नवीन मराठी वर्षाला सुरुवात होत असुन वर्षातील पहिलाच मोठा सण म्हणुनही या सणाची विशेष ओळख आहे, तर प्रत्येक मराठी माणुस हा आपला कोणताही नवीन व्यावसाय अथवा शुभ कार्याची सुरुवात याच सणापासुन सुरु करण्याचा प्रयत्न करीत असल्याने या सणाचे महत्व महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

फोटो ओळी – म्हसवड येथे साखरगाठी बनवणारे कारागीर.