(अजित जगताप)

सातारा दि: महाराष्ट्रातील सर्वाधिक पुरस्कार प्राप्त सहकार क्षेत्रातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पारदर्शक कारभार असल्याने जिल्हा बँकेचा नावलौकिक देशभर पसरला आहे. परंतु, जिल्हा बँकेच्या कर्मचारी भरती बाबत विलंब होत असल्याने बेरोजगारांची चेष्टा सुरू झाल्याची चर्चा पुणे- मुंबई- ठाणे येथील सातारा जिल्ह्यातील मूळनिवासी बेरोजगार करू लागलेले आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये नोकरी- व्यवसाय उपलब्ध होत असेल तर आनंदाने सातारा जिल्ह्यात स्थायिक होण्याचे स्वप्न अनेक बेरोजगार बघू लागलेले आहेत. त्यापैकी काहींनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२४ मध्ये झालेल्या लिपिक आणि शिपाई पदासाठी अभ्यास करून परीक्षा दिलेले आहे. या परीक्षेचा निकाल अद्यापही न लागल्याने परीक्षेला बसलेल्या सुमारे पंचवीस हजार बेरोजगारांच्या समोर आता यज्ञ प्रश्न निर्माण झालेला आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या एकूण जागा ३२३ असून लिपिक पदासाठी २६३ व शिपाई पदासाठी ६० कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा बँक गेल्या वर्षभरात आणि पुढील काळात अनेक अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. काहींना गुणवत्तेच्या आधारे मुदतवाढ देऊन आवश्यक अधिकाऱ्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु, लिपिक व शिपाई पदासाठी अद्यापही निकाल जाहीर न केल्यामुळे ही भरती प्रक्रिया आता विलंबाने होत असेल तर आता काही बेरोजगार हे इतर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करू लागलेली आहेत. काहींची वयोमर्यादा संपत आल्यामुळे त्यांना खूप मोठी आशा निर्माण झालेली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे चार आमदार व महायुतीचे चार कॅबिनेट मंत्री असे आठ लोकप्रतिनिधी काम करत आहेत. सातारा जिल्हा बँकेच्या संचालक पदी ही वजनदार मंडळी असून सुद्धा अद्यापही कर्मचारी भरती परीक्षा घेऊनही होऊ शकलेली नाही. देशामध्ये आणीबाणी व युद्धजन्य परिस्थिती असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात. एखादी मोठी आपत्ती असेल तरीसुद्धा देशाचे हित पाहून निर्णय घेणे भाग पडते. परंतु सुदैवाने असं काहीच न घडता सुद्धा जिल्हा बँकेच्या नोकर भरती बाबत अद्यापही हिरवा कंदील न दाखवल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार व त्यांचे पालक चिंताग्रस्त झालेले आहेत. सातारा जिल्हा बँकेमध्ये निवडून आलेले संचालक हे ग्रामीण भागातील सोसायटीच्या व इतर सभासदांच्या मतांवर संचालक झालेले आहेत. त्यांना याबाबत जाब विचारण्याचे धारिष्ट काही सभासदांना उरलेले नाही. त्याला कारणही बरीच आहेत. लोकशाहीने दिलेल्या मताचा अधिकार सदविवेकबुद्धीने वापरला तर जाब विचारण्यासाठी अनेकजण पुढे येतात. पण, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेकांनी मत देताना लोकशाही मार्गाने प्रचलित व्यवस्था करून मत दिलेले आहेत. हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या कर्मचारी भरती बाबत सर्वांना सुबुद्धी द्यावी. अशी मागणी काही परीक्षार्थी यांनी केलेली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा बँकेच्या नोकर भरती बाबत असं कोणतं समीकरण जुळत आहे. याचा मात्र अजूनही अनेक जण शोध घेत आहेत. पण त्याला अद्याप यश न आल्यामुळे जिल्हा बँकेच्या नोकर भरती प्रक्रिये बाबत खुल जा सिम सिम… अशी जादूची कांडी शोधण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत.
अनेक तरुणांना आपल्या आयुष्यातील शुभविवाह करण्याचा योग या भरती प्रक्रियेमुळे मिळणार त्यामुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहेत पण भरती होऊ शकलेली नाही.सातारा जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची परीक्षा घेऊनही विलंबाने निकाल लावल्याबद्दल जिल्हा बँकेला एखादा पुरस्कार मिळाल्यास नवल वाटणार नाही. असं काहींनी विनोदाने सांगितले. दरम्यान, याबाबत लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
फोटो- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक