
लोणंद: शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा विकास हा आमचा विकास आहे. या महाविद्यालयाला कोणतीही मदत लागली तर नगरपंचायतीच्या वतीने सर्वोतोपरी आम्ही सहकार्य करू. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा शिकवते तसेच नेतृत्वाबरोबर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देते व विकसित करते. या शिबिरातून विद्यार्थी आयुष्यभरासाठी लागणारी अनुभवाची शिदोरी घेऊन जातात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञतेच्या भावनेने विद्यार्थ्यांनी काम करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कामाचा आदर्श समाजापुढे ठेवला पाहिजे. महाविद्यालयाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोणंद नगरपंचायत लोणंदच्या नगराध्यक्षा मा. सौ. सीमा खरात यांनी केले.
लोणंद येथील रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद मधील राष्ट्रीय सेवा योजना व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२५ शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ” राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या हेतूने अनेक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांनी श्रमाची प्रतिष्ठा जपणे गरजेचे आहे. कोणतेही काम लहान मोठे नसते. कृतीने सांगितलेल्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतात. माणूस हा त्याच्यातील बुद्धिमत्तेबरोबरच समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कामाने ओळखला जातो. भारताच्या विकासामध्ये तरुणांचे योगदान मोलाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मधील अहंकार दूर ठेवून प्रामाणिकपणे तळमळीने काम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये विचार प्रगल्भता वाढावी हा या संस्कार शिबिराचा उद्देश आहे. विद्यार्थ्याने मनाची आणि शरीराची स्वच्छता ठेवून समाज हितासाठी आपले योगदान देणे फार गरजेचे आहे. श्रमाने माणसाचे मन, मेंदू आणि मनगट मजबूत होत असते. “
यावेळी व्यासपीठावरती माजी नगराध्यक्ष मा. सचिन नानाजी शेळके, नगरसेविका मा. सौ दिपाली निलेश शेळके, प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे, मालोजीराजे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. चंद्रकांत जाधव, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज मुलींचे प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे, मा. वैभव खरात, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, कार्यक्रमाधिकारी डॉ. बाबासाहेब सायमोते, कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मा. सचिन शेळके, सौ. दिपाली शेळके, प्राचार्य चंद्रकांत जाधव, प्राचार्या.सौ. सुनंदा नेवसे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बाबासाहेब सायमोते यांनी करून दिला. “स्वच्छ भारत अभियान” या उद्देशाने हे श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महाविद्यालय परिसरामध्ये वृक्ष लागवड, पाणी आडवा पाणी जिरवा, परिसर स्वच्छता, परिसर सुशोभीकरण तसेच करिअर गाईडन्स, वृक्ष संवर्धन काळाची गरज, स्टार्टअप मधील संधी, महिला सबलीकरण व महिलांचे आरोग्य, सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर समाज प्रबोधन पर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य प्रा . भीमराव काकडे, ग्रंथपाल नंदकुमार साळुंके, प्रा. अमृता काळोखे, शिक्षक शिक्षकेत्तर सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. डी. नायकु यांनी केले. मान्यवरांचे आभार डॉ. अनिल जगताप यांनी मानले.