
म्हसवड.. प्रतिनिधी
तत्कालीन वेळी समाज अज्ञानरूपी अंधारात असताना सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया घातल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी म्हसवड येथे केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे बालिका दिन कार्यक्रम आयोजित केला होता. सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन सुलोचना बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बाबर म्हणाल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मोहीम रुजवली. समाजातील विकृत प्रवृत्तीने अनेक वेळा सावित्रीबाईंना अपमानित केले , मात्र त्या डगमगल्या नाहीत. शिक्षण हेच प्रगतीचे साधन असल्याने, सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाची गरज ओळखली व त्याद्वारे प्रगतीचे पाऊल टाकले. या निमित्ताने सुलोचना बाबर यांनी सावित्रीबाईंच्या जीवन पटाची तपशीलवारपणे माहिती उपस्थितताना देऊन त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने पुनम जाधव , प्रांजल लुबाळ , समीक्षा बारवासे यांनी मनोगत केले तर मोहिनी राजगे हिने सावित्रीच्या ओव्या कथन केल्या. इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. सूत्रसंचालन रोहिणी काटकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार साधना दुधाळ यांनी व्यक्त केले.